देशात बेटी बचाव मोहीम राबवली जात असतानाच पुण्यात माता पित्याने मृत्यूनंतरही नवजात मुलीला घरी नेण्यास नकार दिला आहे. आता या नवजात मुलीवर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाला असून गेल्या चार दिवसांपासून नवजात मुलीचा मृतदेह शवागारात पडून आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील धामणगावधील एक महिला पुण्यात काम करते. प्रसूतीकळा सुरु होताच कुटुंबीयांनी महिलेला रुग्णालयात नेले होते. ८ मार्चरोजी महिला दिनीच ही महिला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल झाली होती. ९ मार्चरोजी या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र बाळाला श्वास घेता येत नसल्याने तिला उपचारासाठी लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पोटच्या मुलीच्या उपचाराकडेही या दाम्पत्याने पुरेसे लक्ष दिले नाही. याऊलट तीन दिवसांनी पालकांनी नवजात मुलीला ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र बाळाला व्हेंटिलेटरवरुन काढल्यास तिचा मृत्यू होईल असे सांगत रुग्णालय प्रशासनाने बाळाला त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. यानंतर दाम्पत्याने डॉक्टरांशी हुज्जतही घातली. या घटनेनंतर नवजात मुलीच्या वडिलांनी रुग्णालयात येणे बंद केले. तर तिच्या आईवर रुग्णालयातच उपचार सुरु होते. तिच्या आईसोबत एक वृद्ध महिला असायची असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

२२ मार्चला नवजात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी नवजात मुलीला आईकडे सुपूर्तही केले. पण ऐवढ्या रात्री घरी जाता येणार नाही असे सांगत आई आणि तिच्या सोबतच्या वृद्ध महिलेने नवजात मुलीचा मृतदेह शवागारात ठेवला. दोघींनी डिस्चार्ज कार्डवर अहमदनगरऐवजी पनवेलचा पत्ता दिला आणि रुग्णालयातून निघून गेल्या. मुलीचा मृतदेह स्वीकारण्यासाठी कोणीही न आल्याने रुग्णालय प्रशासनाने पालकांशी फोनवरुन संपर्कही साधला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. याप्रकरणी पोलिसांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दाम्पत्याला तिसरी मुलगी झाल्याने ते नाराज होते अशी माहितीही उघड झाली आहे.  दरम्यान, नवजात मुलीला मृत्यूनंतरही आईवडीलांनी नाकारल्याने शवागारात ठेवावे लागले आहे. बेवारस म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करायचे का असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे.

पोलीस म्हणतात, अजून तक्रारच नाही

बेवारस मृतदेह हे पोलिसांचे प्रकरण असून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ही सर्व पोलिसांची जबाबदारी आहे. अर्भक हे आम्ही पोलिसांना दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शवागारात ठेवले आहे असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मनोज देशमुख यांनी सांगितले.
तर पोलिसांनी रुग्णालयाकडून अद्याप तक्रार आलीच नाही असा दावा केला आहे. अर्भकासंबंधी आमच्याकडे यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयाने कुठलीच माहिती किंवा तक्रार दाखल केलेली नाही. माहिती मिळाल्यावर आमचे पथक रुग्णालयात गेले आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांनी दिली आहे.