पुणे शहरातील शालेय बससेवा दरवाढीच्या विरोधात मंगळवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांच्या नेतृवाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. ‘मुक्ताताई न्याय द्या, तुकाराम साहेब जागे व्हा’ असे फलक हातात घेऊन विद्यार्थी बस सुरु करण्याची मागणी करताना दिसले. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अचानक बस दरवाढ जाहीर केल्यानंतर अनेक शाळांनी बस सेवा नाकारली होती. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आज नगरसेवकांना गुलाबाची फुले देत, बस सेवा सुरु करण्याची मागणी केली. बस सेवा पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदनही देण्यात आले.

यावेळी कुणाल कुमार म्हणाले की,  तुकाराम मुंढे यांनी कोणत्या आधारे ही दरवाढ केली याची माहिती नाही. संचालक मंडळाला त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. या गंभीर प्रश्नावर मुंढे यांच्याशी तात्काळ चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पुणे शहरातील शाळा १५ जूनपासून सुरु झाल्या आहेत. शालेय विद्यार्थांसाठी पीएमपीएमएलकडून अगदी अल्प दरात बस सेवा दिली जाते. मात्र पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारावी लागली. वारंवार निवेदन देऊन देखील महापालिका प्रशासन आणि पीएमपीएमएल प्रशासन निर्णय घेत नाही. त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पालिका आयुक्त कुणाल कुमार मुंढे यांच्याशी कधी चर्चा करणार? तसेच बस दरवाढीच्या निर्णयाबद्दल मुंढे काही फेरविचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.