धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला असतानाच, लेटलतिफ कर्मचाऱ्यांनाही जोरदार दणका दिला आहे. कार्यालयात उशिरा आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचा आजचा पगार कापण्यात आला आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिकेच्या परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी काल पदभार स्वीकारला. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकाराताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची पूर्वीची साडेदहा ते साडेपाच या वेळेत बदल करून पावणेदहा ते पावणेसहा अशी वेळ केली. तर कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट आणि जीन्स वापरू नये, अशी ताकीद दिली होती.

कोणत्याही कर्मचाऱ्याने इतर कार्यालयांत कामाशिवाय जाऊ नये. त्यात प्रामुख्याने चहा घेण्यासाठी इमारतीच्या बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जावे. धूम्रपान करता कामा नये. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. पुणे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. त्यांची संख्या सद्यस्थितीला १२ लाख असून त्यातून दीड कोटी रुपये उत्पन्न मिळत असून ते दोन कोटींवर जाऊ शकते. त्यासाठी प्रत्येक आगारातून बस वेळेवर सोडल्या पाहिजेत. त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असून प्रवाशांबरोबर चांगल्या प्रकारे संवाद साधला पाहिजे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगली भावना निर्माण होऊन ते दररोज बसने प्रवास करतील. त्याचबरोबर थांब्यावरच गाडी थांबली पाहिजे. पुढे-मागे गाडी थांबवू नका. ज्येष्ठांना प्राधान्य देण्याची गरज आहे. भविष्यात उत्पन्न न वाढल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर गाड्यांच्या दुरुस्तीसाठी जे स्पेअर पार्ट लागतात, तितकीच खरेदी करा, अधिकची खरेदी करू नका. त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. आज त्यांनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली. उशिरा आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा आजचा पगार कापला. तर परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसची दुरुस्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नादुरुस्त बससंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यावेळी जवळपास ४०० ते ५०० बस नादुरुस्त असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावर तात्काळ त्यांनी १०० बस दुरुस्त करा. त्यासाठी एक कोटींचा निधी मंजूरही केला. येत्या १५ दिवसांत या बस रस्त्यावर धावल्या पाहिजेत, असे आदेशही त्यांनी दिले.