पुण्यातील प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यात जायला आवडेल आणि पुण्यात काही काळ शिक्षणासाठी वास्तव्यास होतो. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’ बसचा प्रवास कसा आहे, हे चांगलेच माहिती आहे, असे ‘पीएमपीएमएल’चे नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सांगितले. मुंढे यांनी ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा आणि अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.

पुणे शहरात ओला आणि उबर कंपन्याच्या सेवा नागरिक आधिक प्रमाणात घेतात. या कंपन्या नागरिकांना जलद सेवा देतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या कंपन्या फायद्यात आहेत. अशाच प्रकारे पीएमपीएमएलच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी; तसेच परिवहन सेवेच्या बसने अधिकाधिक नागरिकांनी प्रवास करावा, यासाठी येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणार असल्याचा निर्धारही तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.

पुणे शहराची वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कंपनी कायद्यानुसार पीएमपीएमएलचे काम केले जाणार आहे. व्यावसायिक दर्जा राखून प्रवासी केंद्रित सेवा देणार असून, नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम करताना तेथील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करताना अनेक निर्णय घेतले. त्याप्रमाणे पुण्यातही असेच निर्णय घेतले जातील. शहरातील प्रत्येक प्रवाशाला चांगली सेवा देणे हा प्रमुख उद्देश असणार आहे. प्रथम फायद्यातील आणि तोट्यात असणारे मार्ग यांचा अभ्यास केला जाईल. ‘ब्रेकडाऊन’चे प्रमाण देखील आधिक प्रमाणात आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्याची कारणे शोधली जाणार आहेत. तसेच प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जायला आवडेल आणि पुण्यात काही काळ शिक्षणासाठी वास्तव्यास होतो. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’चा प्रवास कसा आहे, हे माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.