पुणे पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील पोलीस दाम्पत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांची मोहीम संशयाच्या फे ऱ्यात अडकली आहे. राठोड दाम्पत्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बुधवारी दिले.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट मोहिमेसाठी सुटी मिळावी, असा अर्ज पोलीस आयुक्तांक डे केला होता. एक एप्रिलपासून तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे सुटीवर गेले होते. त्यानंतर सात जून रोजी राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याची बातमी प्रसृत झाली. राठोड दाम्पत्याने २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.  एव्हरेस्टवर राष्ट्रध्वज फडकाविणारे छायाचित्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले होते. त्या वेळी पुण्यातील गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर होते. राठोड दाम्पत्य  एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांच्या पाहण्यात आले नव्हते. त्यामुळे राठोड दाम्पत्याची कथित एव्हरेस्ट मोहीम संशयास्पद असल्याचे मत गिर्यारोहकांनी व्यक्त केले होते.

पिंपरी-चिंचवड येथील गिर्यारोहकांच्या संघटनेने याप्रकरणी  पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या मोहिमेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

राठोड दाम्पत्याने २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केले होते. परंतु त्यांनी पंधरा दिवसांनी एव्हरेस्ट सर केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे  पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

पोलीस आयुक्त शुक्ला म्हणाल्या, की राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला आहे. राठोड दाम्पत्याची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. चौकशी समितीमार्फ त त्यांची चौकशी करण्यात येईल.

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आताच सांगणे उचित ठरणार नाही. मात्र, राठोड दाम्पत्याची लवकरच चौकशी करून यासंदर्भातील अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त शुक्ला यांनी सांगितले.