दहीहंडीनिमित्त पुणे पोलिसांचा इशारा; उत्सवाचे व्हिडीओ चित्रीकरण

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीबाबत दिलेले निर्देश न पाळणारी मंडळे तसेच गोविंदा पथकांवर कारवाई करण्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे. वीस फुटांवर हंडी बांधावी, गोविंदा पथकात १८ वर्षांखालील मुलांचा समावेश नसावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी तयारी केली असून शहराच्या मध्य भागातील दहीहंडय़ांचे व्हिडीओ चित्रीकरण पोलिसांकडून करण्यात येणार आहे. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या आणि धडकी भरविणाऱ्या उच्चक्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणा वापरणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांचे पेव फुटले आहे. शहराच्या मध्य भागात पूर्वी दहीहंडी बांधून मोठय़ा प्रमाणावर उत्सव साजरा केला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरातील उपनगरांमध्येही मोठय़ा प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे.

दहीहंडीच्या दिवशी होणाऱ्या दुर्घटना विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी साजरी करणारी मंडळे आणि गोविंदा पथकांना काही निर्देश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची पोलिसांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. शहराच्या मध्य भागात मोठय़ा स्वरूपात दहीहंडी साजरी करणारी ३० मंडळे आहेत, तसेच कोथरुड, वारजे, कर्वेनगर, डेक्कन भागांत दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांची संख्या २६१ आहे. दहीहंडी बांधण्याची परवानगी देताना प्रत्येक मंडळाकडून हमीपत्र लिहून घेतले आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे भंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधण्यास परवानगी देण्यात येणार नाही, गोविंदा पथकात अठरा वर्षांखालील मुलांचा समावेश असल्यास अशा मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. आवाजाच्या मर्यादेची तपासणी ध्वनींची तीव्रता मोजणाऱ्या डेसिबल मीटर यंत्रणेमार्फेत करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.