कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीचे अश्लील फोटो काढणा-या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील फोटोच्या आधारे हा तरुण पीडित तरुणीकडून लाखो रुपये उकळत होता. अथर्व सोनवणे (१८ वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे.

अथर्व हा पूर्वी मार्केटयार्ड परिसरात राहत असताना त्याची इमारतीमध्ये राहणा-या पीडितेशी ओळख झाली होती. सात महिन्यांपूर्वी ते दोघे भेटले होते. अथर्वने त्या तरुणीला कॉफी पिण्याच्या बहाण्याने बाहेर नेले होते. यादरम्यान त्याने पीडितेच्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकले आणि तिचे अश्लील फोटो काढले. गेल्या सात महिन्यापासून तो पीडित तरुणीकडून पैसे उकळत होता. आत्तापर्यंत त्याने पीडित तरुणीकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळले होते. त्याने पीडीतेकडे पुन्हा ५० हजारची मागणी केल्याने तिने कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. यानंतर त्यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अथर्वला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.