पोलिस अधिकाऱ्याच्या व्यंगचित्रावरून समाजमाध्यमांत मतमतांतरे
अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपर्डी गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उजेडात आल्यानंतर पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. या पाश्र्वभूमीवर पुणे पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने कोपर्डीच्या घटनेवर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याने असे प्रकार रोखण्यासाठी ‘थर्ड डिग्री’ची मात्राच योग्य असल्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे समाजमाध्यमात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोपर्डीतील घटनेनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध संस्था, संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२४ जुलै) कोपर्डीला भेट दिली. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना कोपर्डीला भेट देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. संवेदनशील तपासावर शक्यतो पोलीस अधिकाऱ्यांनी भाष्य करू नये, असा अलिखित संकेत आहे. असे असताना पुणे शहर पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने कोपर्डीतील घटनेवर एक व्यंगचित्र रेखाटले आहे. त्यामध्ये दोन पोलीस अधिकारी दाखवण्यात आले आहेत. ‘बंद पडलेल्या थर्ड डिग्री सिस्टिमला सरकारनं रीतसर मान्यता द्यावी.. हे असले गुन्हे आपोआप बंद होतील.. अशा ओळी या व्यंगचित्रात आहेत. हे व्यंगचित्र सध्या व्हॉटसअ‍ॅपवरून फिरत आहे.
या व्यंगचित्रावरून समाजमाध्यमात प्रतिक्रिया उमटत आहेत. एकप्रकारे त्या अधिकाऱ्याने मारहाणीचे समर्थनच केले आहे. खरे तर गुन्हेगारांना मारण्याची पद्धत कालबाह्य़ झाली आहे. न्यायालयाने या संदर्भात काही निर्देश दिले आहेत. थर्डडिग्रीला समर्थन देणे म्हणजे पोलिसांचे बौद्धिक दारिद्रय़ आहे. समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. अशा व्यंगचित्रावरून आपला समाज सुरक्षित हातांमध्ये नाही हे प्रतीत होते, अशी प्रतिक्रिया एका वाचकाने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनीही थर्डडिग्रीची पद्धत योग्य असल्याचे स्पष्ट केले. गुन्हेगारांना जरब बसवायची असेल तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत सांगणे उचित आहे. पोलिसांचा धाक गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे. या मागची बरीच कारणे आहेत. मानवाधिकारामुळे पोलिसांना गुन्हेगारांना मारता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात संघटित गुन्हेगारी वाढली आहे. नागरिकांची वाहने जाळणे, घरांवर दगडफेक करणे अशा घटना पुण्यात सातत्याने घडत आहेत. गुन्हेगारांना राजकीय नेत्यांकडून पाठबळ मिळते. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा येते. त्यामुळे गुन्हेगारांना रोखण्यासाठी थर्डडिग्रीची मात्रा योग्य असल्याची प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताना ‘गुंडासाठी काठी’ अशी घोषणा केली होती. पोलीस आयुक्त सिंह यांच्या काळात पुणे शहरात झालेल्या पोलीस चकमकीत (एनकाउन्टर) पाच गुंडांना ठार मारण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस चकमकीत एखादा गुंम्ड मारला गेल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून जवळपास चकमकीत गुंड ठार होण्याच्या घटना बंद झाल्या आहेत, याकडेही एका पोलीस अधिकाऱ्याने लक्ष वेधले.