पुणे पोलिसांकडून तक्रारदारांना ४५लाखांचा ऐवज परत

सहकारनगर भागात सासूची सोनसाखळी चोरटय़ांनी हिसकावून नेली. पोलिसांकडून चोरटय़ाला पकडण्यात आले. चोरटय़ाकडून सासूबाईंची सोनसाखळी जप्त करण्यात आल्यावर पोलिसांकडून त्यांना आज सोनसाखळी परत करण्यात आली. या सोन्याची झळाळी आणखी वाढली, अशी भावना तक्रारदारांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरुपात ॠता कुलकर्णी यांनी बुधवारी व्यक्त केली.

निमित्त होते पुणे पोलिसांकडून आयोजित कार्यक्रमाचे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात चोरीच्या गुन्ह्य़ात जप्त करण्यात आलेला ऐवज तक्रारदारांना बुधवारी प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, शशिकांत शिंदे, रवींद्र सेनगावकर उपस्थित होते. या कार्यक्रमात पोलिसांकडून चोरटय़ांकडून जप्त करण्यात आलेले एक किलो ७५३.४ ग्रॅम सोने तसेच दोन किलो चांदीचे दागिने असा ४५ लाख ३७ हजार ७४३ रुपयांचा ऐवज विविध गुन्ह्य़ातील ७२ फिर्यादींना परत करण्यात आला.

तक्रारदारांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना कुलकर्णी म्हणाल्या, की सहकारनगरमधील आमच्या घराबाहेर सासूबाई थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. घाबरलेल्या सासूने घरात येऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर साधारणपणे महिन्याभराने चोरटय़ाला पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे तक्रारदारांना परत करण्यात आलेल्या सोन्याची झळाळी आणखीन वाढली आहे.

माझे पती निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. कोथरुड भागातील मयूर कॉलनीत माझे आई-वडील राहायला आहेत. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी आई-वडिलांच्या घरी चोरी झाली. आम्ही कोथरुड पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ आधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरु केला. दोन तासात पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा उलगडा केला. चोरटय़ाकडून दागिने जप्त करण्यात आले, असे स्मिता शिवलेकर यांनी सांगितले. तक्रारदार प्रा.दिलीप सावंत यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आभारप्रदर्शन केले.

वर्षभरात तक्रारदारांना चार कोटींचा ऐवज परत

वर्षभरापूर्वी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोनसाखळी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. चोरटय़ांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज परत करण्यासाठी कार्यक्रम घेतले. गेल्या वर्षभरात तक्रारदारांना चार कोटी रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. नागरिक पोलिसांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतात. शेवटी पोलीसदेखील माणूस आहे. त्यांच्याकडूनही चुका होतात. मात्र, पोलिसांवर विश्वास ठेवा, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.