गणेश मंडळांना पोलिसांचा इशारा

शहरातील काही भागांमध्ये गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी व्यापारी, उद्योजक, दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार करायला कोणी पुढे येत नाही. या पाश्र्वभूमीवर बळजबरीने वर्गणी वसूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

बळजबरी करणे तसेच धमकावून वर्गणी मागण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहेत. उपनगरांमध्ये मंडळांची संख्या वाढत आहे. एकाच भागात, एकाच परिसरात दोन-पाच मंडळे आहेत. व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना परिसरातील सर्वच मंडळांना वर्गणी द्यावी लागते. दरवर्षी वर्गणीचा आकडा वाढवला जातो. एखाद्या व्यापाऱ्याने वर्गणी न दिल्यास त्याला धमकाविले जाते. रात्री त्याच्या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या साहित्याची मोडतोड केली जाते. व्यवसाय करायचा असल्याने शक्यतो व्यापारी आणि किरकोळ विक्रेते वाद घालत नाहीत. कार्यकर्ते वर्गणीच्या पावतीवर रक्कम लिहून दुकानदाराच्या हातात पावती देतात. वादाचे प्रसंग टाळण्यासाठी व्यापारी निमूटपणे वर्गणी देतात. सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, वडगाव शेरी, विमाननगर तसेच पिंपरी-चिंचवड भागात वर्गणीसाठी व्यापाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

असे प्रकार सुरू असले, तरी व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांकडून पोलिसांकडे तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा येतात. एखाद्या कार्यकर्त्यांला पकडल्यास कारवाई करू नका, असा दबाब राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही पोलिसांवर येतो. तक्रारदारावर दबाबतंत्राचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गुन्हा दाखल होत नाही. उपनगर तसेच मध्य भागात गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावांहून येणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल केली जाते.

उपनगरात बांधकाम व्यावसायिकांकडून मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून मोठय़ा प्रमाणावर वर्गणी गोळा केली जाते. मंडळाच्या अहवालात जाहिराती द्या, अशीही सक्ती केली जाते. त्यामुळेच जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आतापर्यंत एकच गुन्हा

अशा प्रकरणात आतापर्यंत फक्त एकच गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवार पेठेतील गवरी आळी भाजी मंडईतील दोन भाजीविक्रेत्यांना वर्गणीसाठी धमकावून मारहाण केल्याप्रकरणी गवरी आळी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलांनी तक्रार दिल्यानंतर कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सावाच्या कालावधीत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.

उत्सवापूर्वी पोलिसांनी मध्यभाग तसेच उपनगरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सूचना दिल्या. सक्तीने वर्गणी गोळा करू नये, अशा सूचना पोलिसांनी यापूर्वीच कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. धमकावून वर्गणी मागितल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे.

– पी. आर. पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा