पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. तसेच लाल महालातून सहा वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळाही हटवण्यात आला होता. हे दोन्ही पुतळे महापालिका आयुक्तांच्या विशेष अधिकारात बसविण्यात यावेत; अन्यथा मार्चअखेरीस पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण आदिवासी मराठा महासेनेने दिला आहे. तसेच संभाजी ब्रिगेड आणि नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही संघटनेने सांगितले.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नुकताच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच सहा वर्षांपूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळाही रातोरात हटवण्यात आला होता. हे दोन्हीही पुतळे महापालिका आयुक्तांच्या अधिकारात पुन्हा बसवण्यात यावेत, अशी मागणी ब्राह्मण आदिवासी मराठा महासेनेचे संयोजक प्रवीण जेठेवाड यांनी केली आहे. मार्चअखेरीपर्यंत पुतळे बसवले नाहीत, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय नितेश राणे यांनी पुतळा हटवणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना बक्षीस जाहीर केल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि नितेश राणे यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत नीतेश राणे यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार दाखल केल्यावर भूमिका मांडू, असे राणेंनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता. या घटनेनंतर नितेश राणे यांनी गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षिस जाहीर केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे हे कृत्य पैसे देऊन केल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप महासेनेचे संयोजक प्रवीण जेठेवाड यांनी केला आहे. या घटनेचे गांभीर्य राज्य सरकार आणि पोलिसांना नाही असे वाटते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच नितेश राणे यांची आमदारकीही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटना बघता संभाजी ब्रिगेडने समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या संघटनेवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. दरम्यान, नितेश राणे आणि संभाजी ब्रिगेडविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून, आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.