पुणे शहरात मागील तीन महिन्यांच्या कालावधीत स्वाइन फ्लूने डोकेवर काढले आहे. आज (मंगळवारी) पुण्यात स्वाइन फ्लूमुळे ४ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये ८ वर्षांच्या चिमुरडीचादेखील समावेश आहे. १ जानेवारीपासून आजपर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे एकूण २४ रुग्णांचा बळी गेला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पुणे शहरात १ जानेवारीपासून आजपर्यंत २ लाख ७ हजार ६२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २ हजार ८२५ रुग्ण हे संशयित आढळल्याने त्यांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करण्यात आले. या दरम्यानच्या कालावधीत २४ रुग्णांचा बळी गेला असून यातील ८ जण पुणे शहरातील असून १६ जण पुण्याबाहेरील आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लू आजाराबद्दल दक्षता बाळगण्याचे आवाहन महापालिकेच्या आधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. तसेच या आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.