वर्षभरात केवळ १२३ पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया; स्त्रियांचाही सहभाग घटला

गेल्या दोन वर्षांत शहरातील कुटुंब नियोजनात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात पुण्यात केवळ १२३ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्या असून, दोन वर्षे स्त्रियांच्याही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी होत आहे.
लग्न आणि मूल हीच आयुष्याची इतिकर्तव्यता समजणे आता मागे पडले असून, सर्वसाधारणत: लग्ने उशिरा होत असल्यामुळे कायमस्वरूपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपेक्षा कुटुंब नियोजनाची तात्पुरती साधनेच वापरण्याकडे जोडप्यांचा कल अधिक असल्याचे निरीक्षण स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.
pun01
पुण्याच्या कुटुंब नियोजनाची आकडेवारी २०११-१२ मध्ये मोठी असल्याचे पालिकेच्या माहितीवरून दिसून येत आहे. त्या वेळीही त्यात पुरुषांचा सहभाग नगण्यच होता, परंतु स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची संख्या ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक होती. २०१३-१४ नंतर मात्र पुरुषांबरोबर स्त्रियांचाही कुटुंब नियोजनातील सहभाग तुलनेने कमी झाला आहे. पालिकेच्या आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘स्त्रियांच्या बाळंतपणानंतर लगेच टाक्यांच्या शस्त्रक्रिया अधिक होतात. कुटुंब नियोजनात पुरुषांचाही सक्रिय सहभाग गरजेचा आहे. पुरुष नसबंदी सोयीची असून ती लहान शस्त्रक्रिया आहे. त्यात रुग्णालयात राहावे लागत नाही तसेच वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. पुरुषांची याबाबतची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिवाय स्त्रियांचा गरोदर राहण्याचा दरही कमी झाला असून, त्यामुळे कुटुंब नियोजनाचे लक्ष्य कमी होत गेले आहे.’ ‘कमला नेहरू रुग्णालयात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांसाठी उपलब्धता असून, पालिकेच्या १७ प्रसूतिगृहांमध्ये स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होते. तसेच ४२ पालिका दवाखान्यांमध्येही कुटुंब नियोजनाची साधने व शस्त्रक्रियांविषयी माहिती द्यायची सोय आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘बदललेल्या सामाजिक परिस्थितीत लग्ने खूप लवकर करण्यापेक्षा सर्वसाधारणत: तिशीपर्यंत लग्नाचा विचार सुरू होताना दिसतो. पहिले मूल ३२ वा ३३ व्या वर्षी होणे आता सर्रास दिसून येते. उशिरा लग्न आणि उशिरा व शक्यतो एकच मूल या व्यवस्थेत कायमस्वरूपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यापेक्षा तात्पुरत्या साधनांकडे जोडप्यांचा कल अधिक आहे,’ असे ‘पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनाकॉलॉजी सोसायटी’चे (पीओजीएस) अध्यक्ष डॉ. चारुचंद्र जोशी यांनी सांगितले.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा

पुरुष आणि स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाण नेहमीच व्यस्त राहिले आहे. पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया सोप्या असूनही काही समजुतींमुळे त्या विशेष होत नाहीत. आजची सामाजिक परिस्थिती बदलली असून त्यात कुटुंब नियोजनाचे सरकारी लक्ष्य आभासी आहे. उशिरा मूल झाल्यानंतर त्या स्त्रीचा रजोनिवृत्तीचा काळ जवळ येण्यापर्यंत १०-१२ वर्षांसाठी कुटुंब नियोजनाच्या गोळय़ा, काँडम्स, तांबी बसवणे असे विविध तात्पुरते पर्याय जोडप्यांकडून आता अधिक प्रमाणात वापरले जातात. समाजात घटस्फोटांचे प्रमाणही तुलनेने वाढले असून, नव्या जोडीदाराबरोबर मूल हवेसे वाटणे हेही साहजिक आहे. कायमची नसबंदी शस्त्रक्रिया करून न घेण्यात हाही एक छोटा भाग आहे.
– डॉ. चारुचंद्र जोशी, अध्यक्ष, (पीओजीएस)