गाडय़ा, प्रवाशांच्या वाढत्या संख्येने पुणे स्थानक ‘फुल्ल’; नव्या स्थानकासाठी जागा मिळवण्यापासून सुरुवात
पुणेकरांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनवरील भार सातत्याने वाढत आहे. गाडय़ांच्या संख्येबरोबरच स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढत आहे. दुसरीकडे स्थानकाच्या विस्ताराला अनेक मर्यादा आल्या असून, स्थानकाच्या लगतच्या परिसरातही वाहतुकीच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. भविष्यात या समस्या वाढणार असल्याने हडपसरमध्ये पर्यायी टर्मिनस उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी जागा मिळविणे एक दिव्यच असल्याने या टर्मिनससाठी पुणेकरांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे रेल्वे स्टेशनमध्ये वीस वर्षांपूर्वी पन्नास ते साठ गाडय़ांची रोज ये-जा होत होती. त्या वेळची गरज लक्षात घेता स्टेशनमधील प्रवाशांसाठीच्या विविध व्यवस्था पुरेशा होत्या. मागील काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या गरजेनुसार गाडय़ांची संख्या वाढत गेली. मालगाडय़ा वगळता स्टेशनमध्ये पुणे-लोणावळा लोकलच्या ४४ फेऱ्यांसह सुमारे २५० गाडय़ांची रोजची ये-जा आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्याही झपाटय़ाने वाढली आहे. स्वच्छता, पाणी, पादचारी पूल, पार्किंग आदी सर्व व्यवस्थांवर त्यामुळे ताण येतो आहे. भविष्यातही प्रवाशांची संख्या वाढतच राहणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्यास जागेअभावी मर्यादा आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवाशांची संख्या वाढतच राहिल्यास व्यवस्था कोलमडू शकते. मुळात पहिल्यापासूनच प्रशासनाने नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप होत आहे.
पुणे रेल्वे स्टेशनची सद्य:स्थिती पाहता मध्य रेल्वेकडून पुणे स्टेशनच्या जवळच पर्यायी टर्मिनस उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला खडकी स्थानकाच्या विस्ताराचा विचार झाला, मात्र तेथेही पुरेशी जागा नसल्याने हडपसरमध्ये पर्यायी टर्मिनस उभारण्याचे नियोजन करण्यात आले. या ठिकाणी टर्मिनस उभारल्यास पुणे-लोणावळा व भविष्यातील पुणे-दौंड या लोकलसेवा, तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडय़ा या टर्मिनसवरून सोडण्यात येऊ शकतात. त्यामुळे पुणे स्टेशनवरील ताण मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल.
हडपसर टर्मिनससाठी सर्वात मोठी अडचण जागा मिळविणे हीच आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी चाळीस एकर जागा लागणार आहे. रेल्वेकडून जागेबाबत पाहणीही करण्यात आली आहे. मात्र, ही जागा मिळविणे एक दिव्यच आहे. बहुतांश जागा शेतकऱ्यांच्या आहेत. त्याचप्रमाणे जागेचा सध्याचा बाजारभाव लक्षात घेता जागा मिळविण्यासाठीच कोटय़वधींचा खर्च करावा लागणार आहे. मुळातच ही जागा सहजासहजी मिळेल, अशी शक्यता नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. राज्य शासनालाही या कामात पुढाकार घ्यावा लागणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकाचा उद्या ९१ वा वर्धापनदिन
ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले पुणे रेल्वे स्थानक बुधवारी (२७ जुलै) ९२ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९१६ रोजी या नव्या रेल्वे स्थानकाचा उद्घाटन समारंभ पार पडला होता. त्यासाठी मुंबईहून एक विशेष गाडी आणण्यात आली होती. पुणे रेल्वे स्थानकाला २० वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविण्यात आले होते. या स्थानकाला हेरिटेज वास्तूचा दर्जाही बहाल केला आहे.

विस्तारीकरणातील अडथळे
* सध्याच्या स्थानकाजवळ विस्ताराला जागा नाही
* खडकीत पुरेशी जागा नाही
* हडपसरमध्ये ४० एकर जागा लागणार
* एवढी जागा मिळवणे रेल्वेला अवघड

हडपसर येथे पुण्यासाठी रेल्वेने नवे टर्मिनस उभारण्याची प्रक्रिया दीर्घ आहे, मात्र ती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांचा समन्वय साधण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जागेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठी राज्य शासनाशी चर्चा करण्यात येणार आहे.
मनोज झंवर, पुणे विभाग रेल्वे जनसंपर्क अधिकारी

योग्य नियोजन केल्यास पुणे स्थानकावरच क्षमता वाढविणे शक्य होईल. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्थानकालगतच्या विविध जागांचा नियोजनपूर्व वापर आवश्यक आहे. पर्यायी टर्मिनससाठी हडपसरऐवजी लोणी, उरुळीचा विचार झाल्यास त्या ठिकाणी रेल्वेची जागा उपलब्ध होऊ शकेल.
हर्षां शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

पावलस मुगुटमल