संगणक प्रणालीचा वेग कमी असल्यामुळे कामांना विलंब

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ऑनलाईन सुविधा सुरू झाल्यापासून वाहनचालकांना विविध कामांसाठी तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. या कार्यालयातील ०.४ या संगणक प्रणालीचा वेग कमी असल्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे एकाच कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात, अशा तक्रारी केल्या जात आहेत.

पारदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब आणि कमी वेळात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शासनाने ०.४ ही ऑनलाईन संगणक प्रणाली डिसेंबर महिन्यापासून सुरू केली आहे. मात्र, ही यंत्रणाच विस्कळीत होत असल्याने वाहनचालकांची कोणतीही कामे वेळेवर होत नाहीत. पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, मावळ आदी तालुक्यांचा समावेश होतो. त्या भागातून अनेक वाहनचालक-मालक कामासाठी आरटीओ कार्यालयात येतात. कार्यालयातील कार्यपद्धती ऑनलाईन होऊनही कामे वेळेवर होत नसल्याने दूरवरून आलेल्या वाहनचालक-मालकांच्या वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक नुकसानही मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काही वाहनचालक सकाळी आठपासूनच रांगेत उभे राहिलेले असतात. आरटीओ अधिकाऱ्यांनी विविध कर भरणा करण्यासाठी दोन अतिरिक्त रोखपालांची नियुक्ती केली असली तरी वाहनचालकांची रांग कमी होताना दिसत नाही. एक पावती करण्यासाठी ७ ते १० मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे रांग वाढत जाते. परिणामी नागरिकांची कामे जलदगतीने होत नाहीत. त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहुन कामे करावी लागतात. वाहनमालकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी आरटीओ कार्यालयाने सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.