पुणे शहरात स्वाइन फ्लू आजाराने थैमान घातले असून या आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यावर महापालिका आरोग्य प्रमुख एस. टी. परदेशी म्हणाले की, शहरात आजअखेर उपचार घेत असताना १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २ पुणे शहरातील आणि १५ रुग्ण शहराच्या हद्दीबाहेरील आहेत. तसेच या विषयी दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत या आजाराविषयी पुणे शहरात हायअलर्ट घोषित केले आहे. त्याचबरोबर हवेतील विषाणुंमधील बदलांबाबत संशोधन करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे शहरात २०१० या वर्षांपासून स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या खबरदारीचा उपाय योजना केल्या जातात. मात्र यंदाच्या वर्षी आज अखेर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १५ रुग्ण हे महापालिकेच्या हद्दी बाहेरील आहेत. या आजारामध्ये महिला आणि लहान मुले अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. तर जानेवारीपासून आज अखेर १ लाख ९६ हजार १३२ नागरिकांनी तपासणी केली. त्यामध्ये २ हजार ४१० रुग्ण संशयित आढळल्याने त्यांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार सुरु करण्यात आले आहेत. या कालावधीत १७ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली.