दिवसाचे तापमान ३८ अंशांच्या वर

भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळा पुण्यात चांगल्याच जाणवू लागल्या असून या आठवडय़ात दिवसाचे तापमान लक्षणीयरीत्या वाढले आहे. कमाल तापमान हळूहळू चाळिशीकडे वाटचाल करत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. शुक्रवारी पुण्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या वर गेले, तर पुढच्या तीन दिवसांत ते ४० अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी (१९ मार्च) पुण्याचे कमाल तापमान ३४.६ अंश नोंदवले गेले होते. त्यानंतर दररोज तापमानात वाढच बघायला मिळाली. कमाल तापमानाच्या जोडीने किमान तापमानही वाढले आहे. शुक्रवारी पुण्याचे दिवसाचे तापमान ३८.१ अंश सेल्सिअस होते, तर लोहगाव येथे ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्याचे रात्रीचे तापमानही शुक्रवारी १७.५ अंश होते. त्यामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्रीही प्रचंड उकाडय़ाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार दिवसाच्या तापमानात पुढील तीन दिवस दररोज एका अंशाने वाढ होऊन सोमवापर्यंत (२७ मार्च) ते ४० अंशांवर जाऊ शकेल. या काळात आकाशही निरभ्र राहील. त्यानंतर गुरुवापर्यंत कमाल तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.