नितीन गडकरी यांची अपेक्षा

देशाच्या विकासामध्ये उद्योग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात पुण्याचे मोठे योगदान आहे. पेट्रोलियम पदार्थाची आयात कमी करून अधिकाधिक निर्यातीचे उद्दिष्ट गाठले तरच देशाचा विकास गतीने होऊ शकेल. इंधन निर्मितीच्या संशोधनामध्ये योगदान देत पुण्याने पर्यायी इंधननिर्मितीचे माहेरघर व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय जल आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. निर्यातक्षम अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मराठा चेंबरने योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गडकरी बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष सतीश मगर यांनी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्याकडे चेंबरच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. पालकमंत्री गिरीश बापट आणि चेंबरचे महाव्यवस्थापक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, देशाला साडेसात लाख कोटी रुपयांचे पेट्रोल आयात करावे लागते. २०२२ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आयात ही पेट्रोलियम उत्पादनापेक्षा अधिक असेल. पेट्रोलची आयात कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाच्या वापरावर भर द्यावा लागेल. उसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती करून ते पेट्रोलमध्ये पाच टक्के मिसळले जाते. त्याचे प्रमाण वाढवून २२ टक्क्य़ांपर्यंत नेता येईल. कापूस, भातशेतीच्या काडय़ा यापासून बायोइथेनॉल वापरता येणे शक्य आहे. राज्यातील ८६ साखर कारखान्यातील मळीपासून दुसऱ्या दर्जाच्या इथेनॉलची निर्मिती करता येईल. नावीन्यता आणि संशोधनाच्या माध्यमातून कचऱ्यापासून संपत्ती हे धोरण स्वीकारले तरच प्रगती साध्य होईल. कोळशापासून इंधन निर्मितीचे संशोधन होत आहे. या सर्व प्रयत्नांतून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. निर्यातीमध्ये वाढ होईल आणि रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल.

केंद्राने जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले असून त्यानंतर रेल्वे वाहतूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते रुंद करून ते दोन लाख किलोमीटपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील रस्ते पाच हजार किलोमीटरवरून २२ हजार किलोमीटर लांबीचे करण्यात येणार असून पुणे विभागामध्ये ५० हजार कोटी रुपयांच्या रस्ते उभारणीचे उद्दिष्ट आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, नागपूरमध्ये पाण्याचा पुनर्वापर करून ते पाणी वीज मंडळाला विकले जाते. कचऱ्यापासून इंधननिर्मितीचे उद्दिष्ट साध्य झाले असून नागपूरमधील ५० बसेस बायो मिथेनवर चालविण्यात येणार आहेत. बापट, चौधरी आणि मगर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

बांधकाम व्यावसायिकांनी रस्ते बांधणीमध्ये यावे

गृहनिर्माण क्षेत्रात सध्या ग्राहक नसल्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिका विकल्या जात नाहीत. या सदनिकांच्या उभारणीसाठी काढलेल्या कर्जावर व्याज भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे जोपर्यंत ग्राहक नाहीत तोपर्यंत बांधकाम व्यावसायिकांनी रस्ते बांधणीच्या क्षेत्रात प्रवेश करावा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.