सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्यातील गोंधळाचा फटका बहि:स्थ विद्यार्थ्यांना या परीक्षेतही बसला आहे. एमकेसीएल आणि विद्यापीठाच्या वेळापत्रकात तफावत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.

बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून ते परीक्षेपर्यंत विद्यापीठ आणि एमकेसीएलमध्ये ताळमेळ नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना नेहमीच बसत आला आहे. सध्या सुरू असलेल्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांमध्येही या दोन्ही संस्थांच्या गोंधळाची प्रचिती विद्यार्थ्यांना आली आहे. विद्यापीठ आणि एमकेसीएलने पाठवलेल्या वेळापत्रकात तफावत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला.

बहि:स्थ विद्यार्थ्यांना एका सत्रात राहिलेल्या चारही सत्रांची परीक्षा देण्याची मुभा मिळते. परीक्षेच्या वेळापत्रकात चारही सत्रांच्या बंधनकारक असलेल्या अनेक विषयांची परीक्षा एकाच दिवशी आली. त्यामुळे चारही सत्रांमधील विविध विषयांची परीक्षा एकावेळी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. त्याबाबत एमकेसीएलकडे विचारणा केल्यावर एमकेसीएलकडून विद्यार्थ्यांना सुधारित वेळापत्रक पाठवण्यात आले. मात्र विद्यापीठाने परीक्षा घेताना बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेतलीच नाही. परीक्षा केंद्रालाही बदलेल्या वेळापत्रकाची माहिती नव्हती. त्यामुळे एकावेळी एकापेक्षा अधिक सत्रांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. एमकेसीएलच्या वेळापत्रकाप्रमाणे तयारी करून गेलेल्या विद्यार्थ्यांना वेगळ्याच विषयाची परीक्षा देण्याची वेळ आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. एका दिवसाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी १६ ते १९ मे दरम्यान झालेल्या परीक्षेवर त्याचा परिणाम झाला. प्रामुख्याने ‘संरक्षण आणि सामरिकशास्त्र’ विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एमए) वेळापत्रकात हा गोंधळ झाल्याचे दिसत आहे. याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.