विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या दूरध्वनी क्रमांकावर कॉलर टय़ून्स सुरू केल्याबद्दल आता विद्यापीठाने भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) खडसावले आहे. कॉलर टय़ून्स सुरू झाल्याच कशा.. याचा खुलासाही विद्यापीठाने मागितला आहे.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या दूरध्वनी क्रमांकांवर ऐकू येणाऱ्या चित्रपट संगीताच्या कॉलर टय़ून्स विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय झाला होता. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या क्रमांकावरच या टय़ून्स सुरू झाल्या होत्या. यातील एका क्रमांकावर बेशरम चित्रपटातील ‘बन बेशरम.’, तर दुसऱ्या दूरध्वनी क्रमांकावर ‘जीने लगा हूँ.’ ही गाणी ऐकू येत होती. त्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता विद्यापीठाने या टय़ून्स सुरू झाल्याच कशा याचा शोध सुरू केला आहे.
विद्यापीठात बीएसएनएलकडून दूरध्वनीची सेवा दिली जाते. ‘विद्यापीठ प्रशासन किंवा विभागाकडून कोणतेही आदेश नसताना या कॉलर टय़ून सुरू कशा झाल्या, याचा खुलासा करण्यात यावा,’ असे पत्र विद्यापीठाच्या विभाग प्रमुखांनी बीएसएनएलला पाठवले आहे. आता सुरू असलेल्या टय़ून्सही बंद करण्यात याव्यात अशा सूचनाही विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत.