सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभारावर प्रत्येक परीक्षेच्या वेळी टीका होते.. विद्यापीठाकडून पुढच्या वेळी असे होणार नाही असे आश्वासनही मिळते. मात्र, पुढील परीक्षेच्या वेळी पुन्हा जैसे थे परिस्थितीच असल्याचे समोर येते. हीच परंपरा नुकत्याच झालेल्या आणि होऊ घातलेल्या परीक्षांच्या बाबतीत विभागाने टिकवून ठेवली आहे. मार्चमध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालांत झालेले गोंधळ आणि आता पहिल्या सत्रांच्या परीक्षांच्या नियोजनातील गोंधळ अद्यापही कायम आहेत.
निकाल वेळेवर लावल्याचे दाखवण्यासाठी खोटी तारीख?
विद्यापीठाच्या एप्रिलमध्ये झालेल्या विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निकालाचे गौडबंगाल काय हे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही कळेनासे झाले आहे. गुणपत्रकावर एक तारीख, प्रत्यक्ष हातात गुणपत्रक मिळाल्याची तारीख वेगळीच आणि त्यापूर्वी ऑनलाईन निकालाचीही तारीख वेगळी असा प्रकार विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमएससी) निकालाबाबत झाल्याचे समोर येत आहे.
एमएससीचा ऑनलाईन निकाल हा २३ जुलैला जाहीर झाला. म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर २३ जुलैपासून निकाल दिसू लागला. त्यानंतर २ ऑगस्टला महाविद्यालयांकडे विद्यापीठाकडून गुणपत्रके देण्यात आली. साधारण पुढील दोन दिवसांत म्हणजे ३ आणि ४ ऑगस्टला गुणपत्रके वाटण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर भलतीच तारीख दिसत आहे. गुणपत्रकावर विद्यापीठाने २४ जून अशी तारीख छापली आहे. त्यामुळे निकाल वेळेत लागल्याचे दाखवण्यासाठी विद्यापीठाने ही नवी शक्कल लढवली का, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. गुणपत्रकावर चुकीची तारीख दिसत असल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते आहे.
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किंवा नोकरीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना द्यावी लागते. काही विद्यार्थ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवडय़ात नोकरीसाठी केलेल्या अर्जात निकाल जाहीर झाला नसल्याचे नमूद केले होते. त्यावेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झालाही नव्हता. मात्र, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर जून महिन्यातील तारीख छापून आल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागले.
अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाकडून क्रमांकच नाहीत.
अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या सत्राची ऑनलाईन परीक्षा महाविद्यालयांकडून घेतली जाते. मात्र, या परीक्षेसाठी विद्यापीठाकडून परीक्षा क्रमांक आणि समरी पाठवली जाते. मात्र, या परीक्षांसाठीची समरी तयारच झाली नसल्यामुळे या परीक्षा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अनुक्रमांकानुसार घेण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे. अनुक्रमांकानुसार परीक्षा घेतल्यानंतर गुणांची परीक्षा क्रमांकानुसार नोंद करताना चुका झाल्यामुळे अंतिम निकालातही चुका झाल्याचे यापूर्वीच समोर आले होते. मात्र, तरीही या परीक्षेसाठीही परीक्षा विभागाकडून जुनाच गोंधळ घालण्यात आला आहे.