आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ होण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांकडेच दुर्लक्ष होत आहे. प्रवेश घेण्यापासून ते उत्तीर्ण होऊन गुणपत्रक हाती येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत आणि विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराला गतीही मिळत नाही.
प्रवेश अर्ज भरण्यात अडचणी
विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळ सुरूच न होणे, अर्ज अंतिम न होणे, अर्ज भरत असताना लॉगआऊट होणे अशा तांत्रिक अडचणींना तोंड देताना विद्यार्थी बेजार झाले आहेत.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत तोंडावर असतानाही अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरणे शक्य झालेले नाही. याबाबत विद्यापीठाच्या विभागांमध्ये किंवा प्रवेश विभागात चौकशी करूनही माहिती मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. भाषा, सामाजिक शास्त्र, मानसनीती विभागातील प्रवेश अर्ज भरण्यासाठी सर्वाधिक अडचणी येत आहेत. एकीकडे या शाखांच्या अनेक विभागांना जागा भरण्याएवढेही विद्यार्थी मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक साहाय्यही विद्यापीठाकडून मिळत नसल्याचे दिसते आहे. विद्यापीठाचे संकेतस्थळही अद्ययावत नाही. विभागांच्या लिंकवर अजूनही २००८-०९ सालातील प्रवेश प्रक्रियेच्या सूचना दिसत आहेत. प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर करण्यात आलेल्या विभागात २०१३ मधील पत्रके आहेत.
प्रवेश अर्जामध्ये राज्यातील विद्यापीठे वगळता इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा विचारच केल्याचे दिसत नाही. बहुतेक प्रवेश अर्जामध्ये फक्त पदवीस्तरावरील टक्केवारी भरण्यासाठी रकाना आहे. मात्र, खासगी विद्यापीठातील किंवा बाहेरील विद्यापीठातील ज्या विद्यार्थ्यांनी श्रेयांकन प्रणालीमध्ये परीक्षा दिल्या आहेत. त्यांच्या श्रेणी लिहिण्याचा पर्यायच अर्जात दिलेला नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांसाठीची परिपत्रके गुलदस्त्यात?
विद्यापीठातील अधिकारमंडळे, प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी अनेक निर्णय घेण्यात येतात. यातील काही निर्णय हे थेट विद्यार्थ्यांशी संबंधित असतात, तर काहींचा नकळतपणे विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. मात्र, हे निर्णय किंवा परिपत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत नाहीत.
विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक केले. मात्र, पुनर्मूल्यांकनाचे शुल्क आणि छायाप्रतींचे शुल्क असा एकत्रित खर्च खूप होत असल्यामुळे शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींचे शुल्क चारशे रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत कमी केले. उत्तरपत्रिका निकालानंतर चार महिन्यांपर्यंत जपून ठेवण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. मात्र, ही परिपत्रके विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्धच होत नाहीत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हवी तेव्हा विद्यार्थ्यांना ही पत्रके किंवा निर्णय मिळू शकत नाहीत.
गुणपत्रकेही वेळेवर नाहीत.
अंतिम परीक्षेची गुणपत्रिका मिळणे हा विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या नात्यातील शेवटचा टप्पा. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा शेवटचा टप्पाही विद्यार्थ्यांसाठी सहज-सोपा, सुखावह नसल्याचेच दिसत आहे.
परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिना उलटून गेला तरीही काही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रक हातात मिळालेले नाही. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी अर्ज करण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत परीक्षा विभागात चौकशी करूनही उत्तर मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. महाविद्यालय विद्यापीठाकडे बोट दाखवते आणि विद्यापीठ कानावर हात ठेवते, त्यामुळे विचारायचे कुणाला, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. आमचा निकाल १२ जूनला जाहीर झाला. मात्र, अद्यापही गुणपत्रक मिळालेले नाही. ऑनलाईन निकालाची प्रिंटआऊट स्वीकारली जात नाही. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत,’ असे व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने सांगितले.