राज्यात लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात पुण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आघाडीवर आहे. गेल्या सात महिन्यात पुणे विभागाने लाच घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर तब्बल १२५ गुन्हे दाखल केले आहेत. रंगेहात पकडलेल्या लाचखोरांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात पुणे विभाग मागे आहे.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड असे एकूण आठ विभाग आहेत. गेल्या सात महिन्यात या विभागांनी लाच घेतल्याचे आणि अपसंपदेचे तब्बल ६६० गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये २१ गुन्हे हे अपसंपदा गोळा केल्याचे आहेत, तर आठ गुन्हे अन्य भ्रष्टाचाराचे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईत एसीबीने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. या आठ विभागांपैकी पुणे विभागाने लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला असून सात महिन्यात लाच घेतना पकडल्याचे आणि अपसंपदेचे एकूण १२५ गुन्हे दाखल केले आहेत. पुण्यानंतर औरंगाबाद ९५ आणि नागपूर ९४ या विभागांचा कारवाईत क्रमांक लागतो. मुंबई विभागात सर्वात कमी कारवाई झाली असून या ठिकाणी फक्त ३९ गुन्हे दाखल आहेत.
राज्यात कारवाईत पुणे विभाग आघाडीवर असला तरी शिक्षा होण्याच्या प्रमाणात म्हणावा असा पुढे नाही. राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्यामध्ये ठाणे विभाग पहिल्या क्रमांकावर असून औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभागात गेल्या सात महिन्यात एकूण ९२ गुन्ह्य़ांचा निकाल लागला असून त्यामध्ये ७१ गुन्ह्य़ात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर २१ गुन्ह्य़ातील आरोपींना शिक्षा झाली आहे. शिक्षा होण्याची टक्केवारी ही २३ टक्के असून ती गेल्या वर्षीपेक्षा एका टक्क्य़ाने कमी आहे. राज्यातही लाचखोरांना शिक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस
पुणे विभागाने सुरू केलेल्या कारवाईचा लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे. मात्र, अलीकडे या विभागातील काही अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू झाल्यामुळे गेल्या काही दिवासांमध्ये कारवाईकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अधिकाऱ्यांच्या धुसफुशीमुळे काही सापळे देखील फसले आहेत. त्यामुळे विभागाचे प्रमुख म्हणून आलेल्या एसीबीच्या नवीन अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.