दिवाळी आणि फटाके.. हे समीकरण बदलावे म्हणून विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना आता प्रतिसाद मिळू लागला असून आवाजाच्या फटाक्यांपासून पुणेकर दूर जात असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे. मात्र, शोभेच्या विशेषत: आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची मागणी कायम आहे.
गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांच्या विक्रीत तुलनेने घट झाली आहे. गेल्यावर्षी पावसाच्या शक्यतेमुळे फटाक्यांची विक्री कमी झाली होती. त्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या विक्रीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांच्या खरेदीला ग्राहकांकडून प्रतिसाद कमी मिळतो आहे. मात्र, शोभेच्या फटाक्यांसाठी मागणी कायम आहे. सध्या बाजारात अनार, आकाशात फुटणारे फटाके, बाण, वायर, फुलबाजी अशा शोभेच्या फटाक्यांचे जवळपास दोनशेहून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. आवाजाच्या फटाक्यांमध्ये हजाराच्या माळांना जास्त मागणी आहे. फटाके घेतानाही कमी जागा लागणारे, कमी धूर होणारे असे फटाके घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे भुईनळे किंवा अनार आणि आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची व्रिक्री अधिक होत आहे,’ असे महाराष्ट्र फटाका विक्री केंद्रातील विक्रेत्यांनी सांगितले.
वाढणाऱ्या दरांचा परिणामही विक्रीवर दिसत असल्याचे विक्रेते सांगतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साधारण ५ ते १० टक्क्य़ांनी दरांमध्ये वाढ झाली आहे. फटाक्यांच्या स्टॉल्सना परवानगी मिळण्यात वेळ गेल्यामुळे सुरूवातीला फटाक्यांची विक्री कमी दिसत असली, तरी शेवटच्या टप्प्यांत विक्री वाढली आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाल्याचे देशपांडे-कुलकर्णी फटाका मार्टचे शशिकांत देशपांडे यांनी सांगितले.

फटाक्यांचा आनंद घ्या, पण काळजीपूर्वक
दर दिवाळीमध्ये विविध उपक्रम, आनंद, उत्सव याला गालबोट लागते ते फटाक्यांमुळे घडणाऱ्या अपघातांचे. गेल्या पाच वर्षांत दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांमुळे १३५ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी ही संख्या तुलनेने कमी असली, तरीही १९ घटनांची नोंद गेल्यावर्षी झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर फटाके उडवताना काळजी घेण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी केले आहे.
फटाक्यांमुळे झालेले अपघात
वर्ष    अपघात
२०१४    १९
२०१३    २१
२०१२    ५५
२०११    ३७
२०१०    ३

काय काळजी घ्याल?
– लहान मुलांना एकटय़ाने फटाके उडवू देऊ नका.
– पेटत्या फुलबाज्या शरीरापासून दूर ठेवाव्यात. फुलबाजी वरून खाली टाकू नये.
– फटाके उडवताना टेरिकॉट, टेरिलिन, नायलॉन असे कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरू नयेत. फटाके खिशात ठेवू नका.
– भुईनळे हातात धरून उडवू नका. भुईचक्र किंवा जमिनीवरील फटाके लाथाळू नका.
– बाण उडवताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत. हातात धरून उडवू नका.
– आकाशात उंचावर उडणारे फटाके गच्चीत पडून अनेकदा आगी लागतात. त्यामुळे दिवाळीत गच्चीवरील टाकाऊ तसेच अन्य वस्तू काढून टाकाव्यात.
– फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून ते उडवू नयेत.
– फटाके न फुटल्यास अशा फटाक्यांची दारू काढून ती पेटवू नये, त्यामुळे डोळ्यांना दुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते.
– घरात मोठय़ा प्रमाणावर फटाके साठवू नका.
– फटाके उडवताना हाताशी पाणी राहील अशी व्यवस्था करा. फुलबाज्या वापरून झाल्यावर इतरत्र न टाकता त्या पाण्यात टाकाव्यात.
– खिडक्या, दरवाज्यांच्या पडद्यांजवळ पणत्या लावू नका.

आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाशी संपर्क साधावा. क्रमांक १०१