आगामी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला पंजाब सरकारने मदतीचा हात दिला आहे. या संमेलनाची आठवण म्हणून पंजाब सरकारतर्फे घुमान येथे साडेनऊ एकर परिसरात भाषा भवन, यात्री निवास आणि संत नामदेवबाबाजी महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे संमेलनाचा सुमारे ८० लाख रुपयांचा खर्च कमी झाला आहे.
संत नामदेवांचे वंशज असलेल्या मराठी माणसांना अभिवादन करण्याची संधी या उद्देशातून घुमान येथील साहित्य संमेलन हा पंजाब राज्याचा अधिकृत कार्यक्रम असेल, अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे संजय नहार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी बादल यांची भेट घेतली. घुमान संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंजाब सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव सुरेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे संमेलनास उपस्थित असलेल्या विशेष महत्त्वाच्या व्यक्तींच्या दळणवळणासाठी दोन हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संमेलनासाठी उभारण्यात येणारा मंडप आणि सहभागी साहित्यप्रेमींच्या भोजनासाठीचा खर्च पंजाब सरकार उचलणार आहे. घुमान येथे रेल्वे स्थानक व्हावे आणि घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही बादल यांनी दिली.