विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित करून संरक्षण विभागाचा विरोध

लोहगाव विमानतळावरुन दररोज ८० विमानांचे उड्डाण होते आणि तेवढी विमाने तेथे उतरतात. त्यात हवाई दलाच्या केवळ सहा विमानांचा समावेश असतो. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगावपासून ४० किलोमीटर दूर आहे. देशाच्या सीमेवर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबई, नवी मुंबईबरोबरच पुरंदर विमानतळावरील नागरी आणि व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात येतील, असे स्पष्टीकरण भारतीय विमानतळ प्राधिकरणाने संरक्षण विभागाला दिले आहे.

मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई आणि मुंबईच्या बंदराची सुरक्षाव्यवस्था हवाईदलाकडे आहे. देशाच्या सीमेवर सध्या तणाव असून त्यामध्ये हवाई दलाची भूमिका निर्णायक राहणार आहे. पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास लोहगाव विमानतळावरुन लष्कराच्या उड्डाणांमध्ये अडचणी निर्माण होतील. तसेच पुरंदर येथून होणारी नागरी उड्डाणे आणि लोहगाव विमानतळावरुन होणारी लष्करी विमाने यांच्यात ताळमेळ साधणे अवघड आहे, असे विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित करत संरक्षण विभागाने पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध दर्शविला असून अद्याप पुरंदर विमानतळाला हिरवा कंदील दाखविलेला नाही.

सद्य:स्थितीत लोहगाव विमानतळावरुन नागरी, व्यावसायिक उड्डाणांबरोबरच हवाई दलाच्या विमानांचेही उड्डाण होत असून त्यामध्ये हवाई दलाच्या उड्डाणांवेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. तर पुरंदर विमानतळ ४० किलोमीटर दूर असूनही तेथून होणाऱ्या नागरी उड्डाणांमुळे हवाई दलाच्या विमानांच्या उड्डाणांना कशी काय अडचण येईल, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून त्याबरोबरच नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि विकासदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. पुरंदर विमानतळामुळे हवाई दलाच्या विमान उड्डाणांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांबाबत संरक्षण विभागाचे समाधान होणारा योग्य अहवाल तयार करु, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.विमानतळ प्राधिकरणाने पुरंदर येथून होणाऱ्या विमान उड्डाणांमुळे हवाई दलाच्या विमानांना अडचण नाही, गंभीर परिस्थितीत पुरंदर विमानतळावरुन होणारी नागरी, व्यावसायिक उड्डाणे रद्द करु, देशाच्या सुरक्षेबरोबरच नागरी सोयी-सुविधा, विकासही महत्त्वाचा आहे, पुरंदर विमानतळ ४० किलोमीटर दूर असल्याने लष्कर आणि नागरी उड्डाणांमुळे अडचण येणार नाही, पुण्याचे भौगोलिक, व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे, असे स्पष्टीकरण संरक्षण विभागाला दिले आहे.