महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी दिला जाणारा पुष्पा पुसाळकर पुरस्कार कॉन्टिनेन्टल प्रकाशनला नुकताच प्रदान करण्यात आला. संदीप खरे यांच्या ‘तुझ्यावरच्या कविता’ या कवितासंग्रहाच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते देवयानी अभ्यंकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार पुरस्कृत करणारे माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा. मििलद जोशी आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन याप्रसंगी उपस्थित होते. अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केल्याबद्दल राजेंद्र बनहट्टी यांचा डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. प्र. चिं. शेजवलकर म्हणाले, कॉन्टिनेन्टल प्रकाशनने गुणवत्तापूर्ण साहित्य प्रकाशित करण्याची आपली परंपरा कायम जपली आहे. त्यामुळे या प्रकाशनतर्फे आपले पुस्तक प्रकाशित होणे हा लेखकाला बहुमान वाटतो.
राजेंद्र बनहट्टी म्हणाले, मातृसंस्था असलेल्या ‘मसाप’ने केलेला सत्कार महत्त्वाचा वाटतो. पुसाळकर पुरस्कार कॉन्टिनेन्टल प्रकाशनला दिल्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे.
देवयानी अभ्यंकर म्हणाल्या, आशयाबरोबरच नव्या पिढीचे प्रकाशक पुस्तकाच्या निर्मितीकडेही गांभीर्याने लक्ष देत आहेत. ‘मसाप’सारख्या मान्यवर संस्थेने अमृतमहोत्सवी वळणावर कॉन्टिनेन्टलचा सन्मान केल्याने या पुरस्काराचे मोल अधिक आहे. कवी संदीप खरे यांच्या पत्नी सोनिया खरे यांच्यासह साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रा. मििलद जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी आभार मानले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.