लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना सत्तेत राहूनही आपली भूमिका बदलत आहेत. आता शिवसेना अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करत असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांची अवस्था ‘गजनी’ चित्रपटातील आमिर खानप्रमाणे झाल्याचे भासते, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नावर भूमिका मांडली.

पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्याच्या आत्महत्या, फसलेली कर्जमाफी याबद्दल सरकारला काही वाटत नाही. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. एकवेळ झोपलेल्या जागे करता येईल. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करणे अवघड आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
ते म्हणाले की, सरकारची निष्क्रियता राज्याला दिवसेंदिवस अधोगतीकडे घेऊन जात असून कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक आहे. त्यातून शेतकऱ्याच्या हाती काही लागणार नाही. कच्च्या तेलाचे भाव कमी असतानाही पेट्रोलचे दर कमी होत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे विषयी ते म्हणाले की, राणे पक्षात राहावेत, त्यांनी पक्षातील लोकांना त्यांनी मार्गदर्शन करावे, असे आम्हाला वाटत होते. पण त्यांनी आता निर्णय घेतला आहे. त्यांनीच त्यांच्या निर्णयाचे मूल्यमापन करावे, असे त्यांनी सांगितले.