बनावट ओळखपत्र तयार करून त्याच्या आधाराने रेल्वेचे ई-तिकीट काढले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या मोहिमेत हा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी एका अनधिकृत एजंटला अटक करण्यात आली आहे.
प्रकाश सीताराम चौधरी (वय ३२, रा. प्रेरणा अपार्टमेंट, पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मध्य रेल्वेच्या पुणे मंडलामध्ये अवैधरीत्या तिकीट काढणाऱ्यांच्या विरोधात सहायक सुरक्षा आयुक्त लाल बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पथकाने चौधरी याच्याकडून होत असलेला अवैध तिकीट काढण्याचा प्रकार उघडकीस आणला. त्याच्याकडून २६ हजार ३६२ रुपये किमतीची १८ तिकिटे जप्त करण्यात आली आहे.
चौधरी याला बाणेर रस्त्यावरील ‘प्राइम मेडिसीन’ या दुकानात पकडण्यात आले. चौधरी हा अवैधपणे ई-तिकीट काढण्यासाठी प्रक्रिया त्याच्या संगणकावरून करीत होता. त्याचप्रमाणे या तिकिटांसाठी तो बनावट ओळखपत्रांचा वापर करीत होता. प्रत्येक तिकिटासाठी तीनशे रुपये अतिरिक्त रक्कम घेऊन तो या तिकिटांची प्रवाशांना विक्री करीत होता. या कारवाईमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल दत्ता, सहायक निरीक्षक डी. एस. राजपूत, रामसिंह मीना, सहायक उपनिरीक्षक पासलकर, त्याचप्रमाणे एस. डी. बाडे, झगडे, कटवटे, के. पी. यादव आदींनी सहभाग घेतला.