मागील आठवडय़ामध्ये फुरसुंगी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेची वाहिनी तोडण्याचा प्रकार झाला. गाडी थांबल्यानंतर खिडकीतून हात घालून चोरटय़ांनी एका महिलेची पर्स पळवली.. ही घटना वरवर साध्या चोरीचा वाटत असली, तरी अशा प्रकारांतून रेल्वेवर मोठा दरोडाही पडू शकतो.. यापूर्वी पुणे-सोलापूर पट्टय़ामध्ये विविध गाडय़ांमध्ये अशा प्रकारच्या लुटमारीच्या व दरोडय़ाच्या घटना घडल्या आहेत. पुणे-लोणावळा लोकलमध्येही चोरटय़ांनी प्रवाशांना लुटले आहे. मात्र, त्यातून अद्यापही रेल्वे प्रशासनाने ठोस दखल घेतलेली नाही. रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्याचा थेट परिणाम म्हणून स्थानकाबरोबर रेल्वेगाडय़ांमध्येही प्रवासी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
रात्री एखाद्या स्थानकावर गाडी थांबल्यानंतर किंवा सिग्नल न मिळाल्याने मध्येच लोहमार्गावर थांबलेल्या गाडीमध्ये शिरलेल्या लुटारूंनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून किंवा मारहाण करून लुटल्याच्या विविध घटना आजवर घडल्या आहेत. पुणे-सोलापूर मार्गावर भिगवणच्या पट्टय़ामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रेल्वेच्या सिग्नलची वाहिनी तोडून सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा हा प्रकार लुटमारीच्याच उद्देशाने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिग्नलअभावी सह्य़ाद्री एक्स्प्रेस ही गाडी थांबल्यानंतर महिलेची पर्स पळविण्याच्या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र, अशा प्रकारच्या दरोडेखोरांच्या विविध टोळ्या रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या प्रकारामध्ये कार्यरत असल्याने यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणा कमी पडली असल्याचे दिसते आहे. सातत्याने लुटमार होण्याच्या या पट्टय़ांमध्ये रेल्वे डब्यातील खिडक्या व दारे बंद करण्याच्या सूचना देण्यापलीकडे रेल्वेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांबरोबरच पुणे-लोणावळा लोकलचा रात्रीचा प्रवासही सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी लोणावळा रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांनाच त्याचा फटका बसला होता. हे व्यवस्थापक रात्री लोणावळा लोकलच्या पहिल्या डब्यातून प्रवास करीत असताना चोरटय़ांनी त्यांना लुटले होते. त्याबरोबरच त्यांच्यावर चाकूने वारही करण्यात आले होते. अनेक प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात हे अनुभव आले आहेत. विविध रेल्वे स्थानकांसह रात्रीच्या रेल्वेगाडय़ाही आता गुन्हेगारांचे अड्डे झाले आहेत.
पुणे-लोणावळा लोकल किंवा विभागात रात्री धावणाऱ्या गाडय़ांमध्ये त्याचप्रमाणे स्थानकामध्ये सातत्याने मारामारीच्या किंवा प्रवाशांच्या लुटमारीच्या घटना घडत आहेत. गाडय़ांमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षेची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. पुणे-लोणावळा लोकलमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घातली जात होती. मात्र, काही वर्षांपासून ती बंद करण्यात आली. त्यामुळे लोणावळा लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा अक्षरश: रामभरोसे आहे. त्याचाच फटका प्रवाशांना बसतो आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना रेल्वेची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, त्या यंत्रणांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, असे सांगितले जाते. मनुष्यबळ तर वाढलेच पाहिजे, पण आहे त्या मनुष्यबळाचाही योग्य वापर करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.