मनुष्यबळ कमी असल्याचा परिणाम; मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी

रेल्वेच्या पुणे विभागात प्रवाशांची वाढत चाललेली संख्या व अपुरे मनुष्यबळ यामुळे उपनगरीय रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांकडे नियमित तिकीट तपासणी होत नसल्याने फुकटय़ा प्रवाशांकडून रेल्वेला चांगलाच फटका बसत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने एखाद्या दिवशी अचानकपणे तिकीट तपासणी करण्याच्या मोहिमेवरच रेल्वेला अवलंबून राहावे लागत असून, या मोहिमेत मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत असल्याने रोजच अनेक जण तिकिटे न काढताच प्रवास करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, बारामती आदी महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे. पुणे-लोणावळा उपनगरीय लोकल सेवेचा लाभ दररोज ८० ते ९० हजार प्रवासी घेतात. त्याचप्रमाणे पुणे-दौंड सेवेलाही मोठी मागणी आहे. या मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे स्थानकाचा विचार केल्यास सध्या या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या सुमारे पावणेदोनशेच्या आसपास गाडय़ा ये-जा करतात. पुणे स्थानकातील व एकूणच विभागातील प्रवाशांची संख्या वाढत असतानाच बरोबरीने विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे.

फुकटय़ा प्रवाशांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणीऐवजी एक-दोन दिवस तपासणीची मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये पुणे विभागात दरववर्षी दोन लाखांच्या आसपास फुकटे प्रवासी सापडतात. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी फुकटय़ांचा आकडा वाढतच चालला आहे. याबरोबरच कारवाईत न सापडलेले प्रवासीही मोठय़ा प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याने या सर्व प्रकारातून रेल्वेला मोठा फटका बसतो आहे.

पुणे-लोणावळा या एका मार्गाचा विचार केल्यास या मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये पूर्वी सातत्याने तिकीट तपासनिसांकडून तपासणी केली जात होती. सध्या या सेवेतील प्रवाशांची संख्या वाढली आहे. पण, महिन्यातून एकदाही लोकल गाडय़ांमध्ये तपासणी केली जात नाही. त्याचप्रमाणे फलाटावरही प्रवाशांच्या तिकिटांची दैनंदिन तपासणी केली जात नाही.

लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी तिकीट तपासनीस वापरले जातात. त्यामुळे उपनगरीय सेवेकडे दुर्लक्ष होते. त्यातून फुकटे वाढत चालल्याचे दिसते. मात्र, अचानक होणारी तपासणी व फुकटय़ांच्या विरोधात विशेष मोहिमा राबवून अशा प्रवाशांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही उपाययोजना करूनही फुकटे प्रवासी वाढत असल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पॅसेंजर मध्येच थांबवून तिकिटांची तपासणी

मनुष्यबळाअभावी नियमित तिकीट तपासणी होत नसल्याने फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. १६ जूनला दौंड-पुणे पॅसेंजर गाडीबाबत तिकीट तपासणीचा वेगळा प्रयत्न करण्यात आला. उरुळी येथील रेल्वे फाटकाजवळ मध्येच ही गाडी थांबवून प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १०१ विनातिकीट प्रवासी सापडले. त्यांच्याकडून २८ हजार ७९० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. १८ तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. अशा प्रकारची मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.