रेल्वेच्या पुणे विभागामध्ये फुकटय़ा प्रवाशांना आळा घालण्यासाठी नानाविध मोहिमा राबविण्यात येत असल्या, तरी फुकटय़ांची ही रांग कमी न होता वाढतच असताना दिसते आहे. रेल्वेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एका महिन्यामध्ये २५ हजार ५१२ फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले आहे. आजवरच्या इतिहासामध्ये एका महिन्यामध्ये फुकटे पकडण्याचा हा विक्रम झाला आहे.
पुणे विभागामध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे स्थानकाबरोबरच विभागात येणाऱ्या विविध स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. पुणे-लोणावळा लोकलच्या प्रवाशांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वीपेक्षा या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नऊ डब्यांची लोकल आता बारा डब्यांची झाली आहे. गाडय़ांची संख्या व प्रवासी वाढत असताना रेल्वेचे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात वाढलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक महिन्याला विशेष मोहीम घेऊन फुकटय़ांना पकडण्यात येत आहे.
मोहिमांच्या माध्यमातून कारवाई झाल्यानंतर फुकटय़ांची संख्या आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते आहे. त्यातूनच एका महिन्यामध्ये २५ हजारांहून अधिक फुकटे पकडण्याचा विक्रम झाला आहे. आजवर हा आकडा २० हजारांच्या पुढे जाऊ शकलेला नव्हता. कारवाईत पकडलेल्या गेलेल्या प्रवाशांकडून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येच १९ हजार ६८० लोकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून १ कोटी ८ लाखांची वसुली करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या ऑक्टोबरमध्ये फुकटे पकडण्याबरोबरच त्यांच्याकडून होणाऱ्या दंडाच्या वसुलीचाही नवा विक्रम झाला आहे. मात्र, हा विक्रम रेल्वेची डोकेदुखी ठरत आहे. कारण पकडलेल्या प्रवाशांशिवाय कारवाईत न पकडले गेलेल्यांची संख्याही मोठी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘‘कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट न काढण्याची वृत्ती सध्या वाढताना दिसत आहे. त्यात सर्व प्रकारच्या प्रवाशांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. रेल्वेकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कमी प्रवासासाठी रेल्वेचे केवळ पाच रुपये तिकीट आहे. पकडले गेल्यास अडीचशे रुपये भरावे लागतात. त्याचप्रमाणे रेल्वेचे तिकीट हा विमा आहे. प्रवासात प्रवाशाला काही झाल्यास त्याच्या वारसांना त्यातून आधार मिळू शकतो. त्याचप्रमाणे जखमीला मदतही मिळू शकते. त्यामुळे योग्य तिकीट काढूनच प्रवास करणे प्रवाशांच्या हिताचे आहे.’’

– वाय. के. सिंह,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग