विनातिकीट प्रवास व स्थानकाच्या परिसरात अवैधरीत्या वाहने लावणाऱ्यांबरोबरच आता स्थानकाच्या परिसरात धूम्रपान करणारे व अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर सध्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेने स्थापन केलेल्या तेजस पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत असून, केवळ तीन आठवडय़ांच्या कालावधीत स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५१७ जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण कारवाईमध्ये विविध कारणास्तव ११२८ प्रवाशांना पकडण्यात आले.
रेल्वेचा वाणिज्यिक विभाग व रेल्वे सुरक्षा दलाचा सहभाग असलेल्या तेजस पथकाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. या पथकाकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. या पथकाने ९ ते ३१ जानेवारी या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये पुणे विभागात स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५१७ जणांना पकडण्यात आले. विनातिकीट प्रवास करणारे ४७२, अवैधरीत्या वाहने उभी करणारे १३५ व स्थानकावर धूम्रपान करणाऱ्या चार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा, स्थानक व्यवस्थापक ए. के. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल वाणिज्य व्यवस्थापक एम. एल. मीना, सहायक वाणिज्य व्यवस्थापक संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. तेजस पथकामध्ये वरिष्ठ तिकीट तपासनीस समीर काळे, कनिष्ठ तिकीट तपासनीस समीर खुमटे, रेल्वे सुरक्षा दलाचे पी. आर. माडवकर, युवराज गायकवाड, नितीन शिंदे आदींचा समावेश आहे.