मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये फुकटय़ा प्रवाशांकडून दिवसेंदिवस नवा विक्रम प्रस्थापित केला जात आहे. मागील काही वर्षांपासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात रेल्वेने केलेल्या कारवाईमध्ये एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये पुणे विभागात तब्बल ३९ हजार २५६ फुकटे प्रवासी पकडले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी याच कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईमधील फुकटय़ांची संख्या या वर्षी १२ हजारांनी वाढली आहे.
रेल्वेच्या पुणे विभागामध्ये तिकीट तपासणीसाठी नियमित कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे फुकटय़ांना पकडण्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येते. त्यात मागील काही वर्षांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. रेल्वेकडून कारवाई होत असली, तरी मुळात तिकीट तपासनिसांची संख्या कमी असल्याने फुकटय़ांना आवर घालणे कठीण काम झाले आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी तिकीट तपासनीस प्रामुख्याने वापरले जातात. त्यामुळे स्थानकावर किंवा पुणे-लोणावळा लोकल सेवा व पुणे विभागातच धावणाऱ्या गाडय़ांमध्ये तिकीट तपासनिसांची कमतरता असते.
पुणे-लोणावळा लोकलमध्ये पूर्वी प्रत्येक डब्यांमध्ये फिरून तिकीट तपासनिसांकडून प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली जात होती. त्यामुळे फुकटय़ा प्रवाशांना आळा बसू शकला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून लोकलमधील तिकीट तपासनीस गायब झाला आहे. त्यामुळे प्रामुख्याने लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत दररोज नव्हे, पण एखाद्या दिवशी अचानक संपूर्ण गाडीमध्ये तिकिटांची तपासणी करून फुकटय़ांना पकडले जाते.
एप्रिल ते जुलै या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईमुळे पुणे विभागाला चार महिन्यांत ४ कोटी ८७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या कारवाईमध्ये २७ हजार ९५९ प्रवाशांना पकडण्यात आले होते. यंदा ही संख्या सुमारे १२ हजारांनी वाढली आहे. त्यामुळे फुकटे प्रवासी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागाचे व्यवस्थापक सुनीत शर्मा व मिलिंद देऊस्कर तसेच वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तिकीट तपासणी ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार असल्याने कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.