पुण्यात जुलै महिन्यात हमखास पडणाऱ्या दमदार पावसाने हुकलावणी दिल्याने धरणांमधील पाणीसाठा अजूनही अध्र्यापेक्षा कमीच आहे. पुण्यासाठीच्या चार धरणांमध्ये मंगळवारी सायंकाळी इनमीन ४८ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. धरणसाठय़ाच्या दृष्टीने मागचे वर्ष विपरीत होते, तरीही ६७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, या वर्षी त्यापेक्षाही वाईट स्थिती आहे.
पुण्यासाठी जुलै महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ातील पाऊस महत्त्वाचा ठरतो. विशेषत: १५ जुलै ते १५ ऑगस्ट या काळात पुण्यात खूप मोठा पाऊस पडतो. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही हीच स्थिती असते. त्यामुळे जुलैच्या अखेपर्यंत पुणे जिल्ह्य़ातील वडिवळे, भामा-आसखेड, आंद्रा, कलमोडी अशी अनेक लहान धरणे ओसांडून वाहायला लागतात. या वर्षी मात्र अजूनही पुण्याच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये केवळ ४८ टक्के इतकाच साठा उपलब्ध आहे. इतर लहान धरणे केवळ ६०-७० टक्के इतकीच भरली आहेत. या वर्षीची ही स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालेली नाही. हे पहिल्यांदाच घडत असावे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या पुणे क्षेत्राचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी दिली.
पुण्यातील चार धरणांमध्ये आतापर्यंत सुमारे १४ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरण २५ टक्के भरले आहे. याशिवाय पानशेत (६२.३३ टक्के), वरसगाव (४३.९०), टेमघर (३३.३६) या धरणांमध्येही तुलनेन खूपच कमी पाणीसाठा आहे.
पुण्यासाठीच्या धरणातील पाणीसाठा (पाणीसाठा टीएमसीमध्ये, पाऊस मिलिमीटरमध्ये) :
धरण         मंगळवारचा पाऊस        १ जूनपासून पाऊस    धरणसाठा    %  
खडकवासला        ०                                ३६९                    ०.४९            २४.९९
पानशेत                २                           १०६६                       ६.६४            ६२.३३
वरसगाव             २                           १०६६                        ५.६३            ४३.९०
टेमघर                 ५                           १४९५                        १.२३            ३३.२
एकूण                                                                               १३.९९             ४८


‘‘पुण्यातील धरणांच्या क्षेत्रात १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एका महिन्याच्या काळात सर्वाधिक पाऊस पडतो. धरणांमध्ये येणाऱ्या एकूण पाण्याच्या तुलनेत या एकाच महिन्यात ४० टक्के पाणी येते. या वर्षी १५ जुलैपासून आतापर्यंत केवळ १० टक्के इतकेच पाणी आलेले आहे. पुढील काही दिवस तरी या क्षेत्रात खूप मोठय़ा पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ही तूट भरून निघणे कठीण आहे. आतापर्यंत अनेक लहान-मोठी धरणे भरून वाहायला सुरुवात होते. धरणांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत बऱ्यापैकी पाणी आलेले असते. आता मात्र विपरीत परिस्थिती आहे. हे अगदीच अपवादाने पाहायला मिळते.’’
– अतुल कपोले, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग