भाजपने निवडणूक प्रचाराचे प्रमुखपद गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिले असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मोदींचा कोणताच प्रभाव जाणवणार नाही व महाराष्ट्रीय जनता त्यांना थाराही देणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चिंचवड येथे केली. बाळासाहेब, उद्धव व राज ठाकरे एकत्र असतानाही काही झाले नाही. आता तर खूपच वेगळे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी टाळी दिली किंवा घेतली तरी काही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक माणिकरावांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रदेश सचिव सचिन साठे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, भाजप-शिवसेना युतीला जनतेने जवळ केले नाही. प्रत्येक ५ वर्षांनंतर त्यांची सदस्यसंख्या घटली. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन नसून केवळ भावनिक राजकारण ते करतात. शिवसेनेने तर विचारात बदल केल्याशिवाय त्यांची वाढ होणारच नाही. आमच्या ‘मित्र’ पक्षांनी त्यांना मदत होईल, अशी भूमिका घेऊ नये. २०१४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीशी आघाडी तसेच जागांच्या अदलाबदलीविषयी पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. सध्यातरी तशी कोणतीही चर्चा नाही. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड असून भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे काँग्रेसचे धोरण आहे. मंत्र्यांच्या घोटाळ्यांमुळे सरकारला बदनामीला सामोरे जावे लागले असले, तरी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा काँग्रेसला फायदा होईल. केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना व विकासाचे राजकारण यावर काँग्रेसचा भर राहील. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपप्रणीत आघाडीतून बाहेर पडले म्हणून काँग्रेसने त्यांना पािठबा दिला. यापुढेही समविचार पक्षांशी आघाडी करू, त्यांच्यासाठी काँग्रेसची दारे खुली आहेत, असे ते म्हणाले.
‘मंत्रिपदासाठी इच्छुक नाही’
मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगत मी मंत्रिपदासाठी बिलकूल इच्छुक नाही, अशी टिपणी माणिकराव ठाकरे यांनी केली. रिक्त असलेली मंत्रिपदे व काँग्रेसच्या वाटणीला असलेल्या महामंडळाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीने शासकीय यंत्रणेचा ताबा घेतला आहे, सत्ता असूनही काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी कार्यकर्ते सातत्याने करतात, असे ठाकरे यांनी मान्य केले.