स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरूवारी पुण्यामध्ये पत्रकारपरिषद घेऊन राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी कांदा दरवाढीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर तोफ डागली. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना कांद्याच्या निर्यातमुल्यात १७वेळा वाढ झाली तर चार वेळा कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. या सगळ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. राज्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना पवार यांच्या काळात दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळेही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे कांद्याच्या भाववाढीसंदर्भात माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आर.आर.पाटलांनी तेव्हा शरद पवारांना राजीनाम्याची मागणी का केली नाही? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.