‘स्वाभिमानी’ नेते व खासदार राजू शेट्टी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याकरिता आंदोलने करतात, ती त्यांची ‘नौटंकी’च असते. तर, दुसऱ्याने केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे ‘फ्लेक्सबाजी’ करतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पिंपरीत बोलताना केली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील महापालिका हद्दीतील नाशिकफाटा ते मोशी हा रस्ता हस्तांतरित करण्याची मागणी महापालिकेने करू नये, तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडूनच विकसित करण्यात यावा, या मागणीसाठी आढळराव यांनी आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
आढळराव म्हणाले, शेतक ऱ्यांच्या प्रश्नांसाठी म्हणून शेट्टी आपल्या मतदारसंघात आले व आपल्यावर टीका केली. मात्र, ते आपले मित्र आहेत. स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी ते आंदोलने करतात. पेपरबाजी करूनही त्यांना फारसे काही साध्य झाले नाही. शेट्टी असोत की बी. जी. कोळसे पाटील यांची ‘नौटंकी’ नेहमीचीच असून ते ‘प्रोफेशनल’ आंदोलक आहेत. शेट्टींचे गुण आता सर्वाना कळू लागले आहेत. त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळत नाही. शेट्टींना त्यांच्याकडे कोणी विचारत नाही, इथे कोण विचारणार. नामोल्लेख टाळून महेश लांडगे यांना उद्देशून आढळराव म्हणाले, राजकारण नवखे खूप जण येतात. स्वत: काही न करता दुसऱ्याचे श्रेय घेण्यास ही मंडळी तत्पर असतात. मंत्री आला की फोटो काढायचे, व्हॉट्स अप, फेसबुकवर टाकायचे. हे प्रसिद्धीसाठीचे चुकीचे प्रकार बंद झाले पाहिजेत. पोरासोरांसारखे फ्लेक्स लावणे आवडत नाही. आढळरावांनी कामे करायची आणि त्याचे श्रेय राष्ट्रवादीने घ्यायचे, असे ‘उद्योग’ करणारी एक जमातच राष्ट्रवादीत आहे, असे ते म्हणाले. नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, राणेंच्या विधानांना फारशी किंमत देऊ नये, असे ते म्हणाले. मुस्लीम मताधिकाराविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या मताविषयी कोणतेही भाष्य करण्याचे आढळरावांनी टाळले.