माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे प्रत्युत्तर
कोणताही अभ्यास न करता बेधडक विधाने करीत सुटणारे डॉ.श्रीपाल सबनीस हे स्वत:च्याच प्रेमात पडून बीभत्स आणि हिडीस स्वरूपाची टीका करू लागले आहेत. अशा श्रेष्ठ साहित्यिकाला ज्ञानपीठ आणि नोबेल मिळू देत. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. पण, यापुढे श्रीपाल सबनीस यांच्यासमवेत मी व्यासपीठावर बसणार नाही, असे संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये ‘आजवरच्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व घटकांना सामावून घेणारी, साहित्य आणि संस्कृतीचे संचित पेलवणारी भूमिका मांडली नाही. मुस्लीम, भटके, दलित या घटकांविषयी दोन ओळीही नव्हत्या. केवळ मेहुण म्हणून मिरवण्यासाठी संमेलनाध्यक्षाचे पद वापरण्यात आले, अशी टिप्पणी श्रीपाल सबनीस यांनी केली होती. त्याला सदानंद मोरे यांनी प्रत्युत्तर तर दिलेच. पण, यापुढे सबनीस यांच्यासमवेत एका व्यासपीठावर बसणार नाही, असेही स्पष्ट केले.
सबनीस स्वत:च्याच प्रेमात पडले आहेत. संमेलन संपून सहा महिने होऊन गेले. ते संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्येच अडकून पडले आहेत. ‘शिमगा गेला तरी त्यांचे कवित्व संपलेले नाही’ याकडे लक्ष वेधून मोरे म्हणाले, आत्मगौरव करताना सबनीस इतके वाहावत जातात की त्याची विधाने टीकात्मक वाटू लागतात. बीभत्स आणि हिडीस पद्धतीने टिप्पणी करताना इतरांचा अधिक्षेप होतो हे अजून त्यांच्या लक्षातच येत नाही. एखाद्या गोष्टीचे किती कवित्व करायचे याचे तारतम्य त्यांना नाही.