नाटय़गृह व्यवस्थापनाच्या पत्रामुळे पालिका प्रशासनापुढे पेच

चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यासाठी पक्षाचे राज्यभरातील जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. मात्र, हे नाटय़गृह पूर्णपणे सुरक्षित नाही, असे पत्र नाटय़गृह व्यवस्थापनानेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांवर कार्यक्रम आला असून ‘व्हीआयपीं’ची जत्रा या ठिकाणी भरणार असताना मोक्याच्या क्षणी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज

चिंचवड नाटय़गृहात २६ आणि २७ एप्रिलला भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, सुभाष भामरे, पीयूष गोयल यांच्यासह केंद्रातील व राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी गेले काही दिवस पक्षपातळीवर सुरू आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबतचा आढावा घेत शनिवारी कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली. या दरम्यान, नाटय़गृहाची सध्याची अवस्था पाहता याचा वापर सुरू ठेवता येईल का, अशी शंका उपस्थित करून नाटय़गृहाची दुरुस्ती व वापराविषयीचा अभिप्राय देण्यात यावा, अशी मागणी नाटय़गृह विभागाच्या सहायक आयुक्तांनी स्थापत्य विभागाच्या (ब क्षेत्रीय कार्यालय) कार्यकारी अभियंत्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. या मागणीपत्राची प्रत शहर अभियंत्यांनाही देण्यात आली आहे. या पत्रप्रपंचामुळे पालिका प्रशासनापुढे चांगलाच पेच निर्माण झाला आहे.

चिंचवडचे नाटय़गृह २५ फेब्रुवारी १९९४ पासून वापरात आहे. सध्या नाटय़गृहाच्या छताचे काम ठिसूळ झाले असून छताचे ‘पीयूपी’ निखळून पडले आहे. काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी छत निखळून पडण्याच्या स्थितीत आहे. पाण्याची गळती होत असल्याने छत ओले आहे. सभागृहाचे दरवाजे निखळण्याच्या बेतात आहे.

खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. नाटय़गृहात दुर्घटना होऊ न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नाटय़गृहाची तज्ज्ञ व्यक्तींकडून पाहणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच, प्रेक्षागृहाचा वापर करावा की नाही, याचा निर्णय घेणे श्रेयस्कर आहे. दुरुस्ती व वापराबाबतचा अभिप्राय देण्यात यावा, असे मुद्दे या पत्रात नमूद आहेत. तथापि, या पत्रावर कोणीही काहीही भाष्य करण्यास तयार नाही.