‘दिसलीस तू फुलले ऋतू, उजळीत आशा हसलीस तू हसले ऋतू’.. ‘भन्नाट 6Sudheer1रानवारा मस्तीत शीळ घाली, रानाच्या पाखरांची रानात भेट झाली’.. ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली’..  प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांची लोकप्रिय गीते ही एका अर्थाने शब्दधून आहेत. एरवी शब्दांतून चित्र रेखाटणाऱ्या मोघे यांनी कुंचल्यावर रेखाटून चितारलेल्या चित्रांतून अवतरलेली रंगधून कलाप्रेमी रसिकांना गुरुवारपासून (१२ मार्च) अनुभवता येणार आहे.
रंग-रेषांच्या विश्वात प्रत्यक्ष भिजू लागू, असं ज्यांना कधी वाटलं नव्हतं अशा सुधीर मोघे यांनी संकोच, न्यूनगंड आणि दडपण या कशाचीही भीती मनामध्ये न ठेवता चित्रकलेतील नवलाईची रुपवाट सुरू केली. चार-पाच वर्षांत त्यांनी जो काही अनाहुत पण, जाणीवपूर्वक केलेला प्रयोगस्वरूप प्रवास निश्चितच रसिकांना भावेल. चित्रपरिभाषेत कुठलीही रूढ वर्गवारी करता येणार नाही म्हणूनच त्यांच्या चित्रप्रदर्शनास ‘रंगधून’ हे शीर्षक योग्य ठरावं असंच ठेवण्यात आले आहे.
कवी-गीतकार, संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधीर मोघे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘कलाछाया’ संस्थेतर्फे गुरुवारपासून (१२ मार्च) चार दिवस दर्पण कलादालन येथे मोघे यांचे ‘रंगधून’ हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. वेगळेच भाववैविध्य असलेल्या अॅक्रॅलिक रंगातील मोघे यांच्या ६० कलाकृती या प्रदर्शनात १५ मार्चपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात पाहण्यास मिळणार आहेत, अशी माहिती कलाछाया संस्थेच्या प्रभा मराठे यांनी दिली.