वाचनाचा छंद असणाऱ्या व्यक्तींच्या संग्रहात ग्रंथ आणि पुस्तकांचा जो बहुमूल्य ठेवा असतो, त्याचे त्या व्यक्तींच्या पश्चात काय करायचे असा प्रश्न अनेकदा कुटुंबीयांसमोर उभा राहतो. अनेकदा ही दुर्मीळ आणि बहुमूल्य गंथ्रसंपदा वापराविना अडगळीत पडते; पण योग्य दृष्टी असेल तर असा ग्रंथसंग्रह योग्य ठिकाणीही कसा पोहोचू शकतो याचे उदाहरण पुण्यातील कंगे कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.
पुण्यातील रंगनाथ कंगे हे राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागात नोकरीला होते. कंगे यांना वाचनाची जबरदस्त आवड होती. त्यामुळे त्यांच्या संग्रहात शेकडो मराठी, इंग्रजी पुस्तके होती. स्वत:च्या तुटपुंज्या मिळकतीतही त्यांनी पुस्तके व ग्रंथ खरेदीचा छंद आवर्जून जोपासला. इतिहास, विज्ञान, संस्कृती, समाजशास्त्र आदी विषयांवरील शेकडो पुस्तकांबरोबरच रामायण, महाभारत, विश्वकोश, मराठी तसेच ब्रिटिश रियासतीचे खंड, एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे खंड, इंग्रजी व्याकरण विषयक पुस्तके, शब्दकोश असा त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. एक खोली भरून असलेल्या या ग्रंथसंपदेचे जतन कसे करायचे असा प्रश्न कंगे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांपुढे होता.
निवृत्त मुख्याध्यापक राजाभाऊ कडेकर गुरुजी हे एकदा कंगे यांच्या घरी गेले असताना कंगे यांची पत्नी इंदुमती कंगे यांनी या ग्रंथसंपदेचा विषय काढला. ग्रंथसंपदा पाहिल्यानंतर त्या संग्रहाचे महत्त्व कडेकर यांच्या लक्षात आले आणि ही ग्रंथसंपदा एखाद्या शाळेच्या ग्रंथालयाला भेट म्हणून देण्याबाबत त्यांनी कंगे यांना सुचवले. तसे केल्यास शाळेच्या शिक्षकवर्गाला आणि विद्यार्थिवर्गाला या पुस्तकांचा तसेच ग्रंथांचा चांगला उपयोग होईल, असेही कडेकर यांनी सांगितले. या कल्पनेला कंगे कुटुंबीयांनी लगेच संमतीही दिली. त्यानंतर कडेकर यांनी कंगे यांच्या ग्रंथसंपदेची वर्गवारी आणि पुस्तकांची माध्यमिक शाळेसाठी जशी यादी करावी लागते तशी विस्तृत यादी तयार केली. पुस्तकांना क्रमांकही दिले. चाकणजवळच्या रासे या खेडय़ात पुण्यातील जगन्नाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या श्री रेणुका विद्यालयाला ही ग्रंथभेट देण्याचे निश्चित करण्यात आले.
पुढच्या टप्प्यात कंगे कुटुंबातील रवी कंगे, वर्षां कंगे, तसेच गणपत शिंदे, संस्थेचे सदस्य विठ्ठल वाडेकर, कडेकर गुरुजी हे सर्व जण रासे येथील शाळेत गेले. शाळेत एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या समारंभात रवी कंगे यांनी हजारो रुपये मूल्याची ही ग्रंथसंपदा मुख्याध्यापिका वाळुंज यांच्याकडे सुपूर्द केली. ही सर्व पुस्तके व ग्रंथसंपदा योग्य ठिकाणी पोहोचली असून त्याचा शाळेला निश्चितपणे उपयोग होईल, असा विश्वास या वेळी कडेकर यांनी व्यक्त केला.