विविध देशातील चाळीसहून अधिक रंगबिरंगी फुलपाखरे.. राजा रविवर्मा यांच्या कुंचल्यातून चितारलेली वेगवेगळी चित्रांची मालिका.. शिवमहिमा विषयावर आधारित जगभरातील दुर्मीळ आणि एकमेवाद्वितीय शंख.. देवदेवतांच्या कलात्मक मूर्ती.. वेगवेगळ्या प्रकारची घडय़ाळे.. ऑलिम्पिक पदके.. विविध मान्यवरांच्या स्वाक्षरींचा समावेश असलेले पुस्तक.. प्रकाशमान करणारे नानाविध दिवे.. असा दुर्मीळ वस्तूंचा खजिना पुणेकरांसाठी खुला झाला.

इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटेम्स पुणे या संस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे हे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य निमंत्रक शशिकांत ढोणे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सोहोनी, उपाध्यक्ष राजेंद्र शहा, सचिव शरद बोरा, खजिनदार नितीन मेहता, बस्ती सोळंकी, नरेंद्र टोळे, सुनील जोशी या वेळी उपस्थित होते. शनिवापर्यंत (२८ मे) सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.

एम. एम. मक्की यांनी संकलित केलेली अमेरिका, मेक्सिको, आफ्रिका, थायलंड, इंडोनेशिया, ब्राझील या देशातील दुर्मीळ चाळीसहून अधिक प्रकारची फुलपाखरे पाहावयास मिळतात. शिवमहिमा विषयावर आधारित संपदा शिंदे यांनी जमा केलेले जगभरातील दुर्मीळ शंख, विजय अग्रवाल यांच्या संग्रहातील वेगवेगळ्या आकारातील आणि नानाविध रंगाचे गुल असलेल्या काडेपेटय़ा, ‘पीएनजी’चे अजित गाडगीळ यांच्या संग्रहातील राजा रविवर्मा यांची मन मोहवून टाकणारी चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत. रबर, स्टील, लाकूड आणि चामडे यापासून तयार करण्यात आलेली वेगवेगळ्या देशातील की-चेन्स, अप्रतिम कारागिरी असलेल्या विविध देवदेवतांच्या मूर्ती मांडण्यात आल्या आहेत. गजानन पटवर्धन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वाक्षरीचा संग्रह, घडय़ाळे, ऑलिम्पिक पदके, फुलदाणी, अडकित्ते, फ्रेम्स अशा दुर्मीळ वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.

दिव्यांचा संग्रह

श्याम मोटे यांनी जमा केलेला दिव्यांचा संग्रह हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ ठरले आहे. दहा किलो वजनाचे तांब्याचे आणि जहाजामध्ये प्रकाश पाडण्यासाठी केरोसिनवर वापरावयाचे ७५ वर्षांपूर्वीचे दिवे, रेल्वेचे सिग्नल देण्यासाठी वापरावयाचे जुने लाल आणि हिरव्या भिंगाच्या काचेचे जर्मनीमध्ये तयार झालेले दिवे, सायकलसाठी वापरला जायचा तो कार्बाईडचा दिवा, अमेरिकेने भारतामध्ये वापरण्यासाठी तयार केलेले पितळी रॉकेलचे दिवे, पेट्रोमॅक्स या जर्मन कंपनीचे रॉकेलचे दिवे आणि व्हिक्टोरिया बग्गी म्हणजेच घोडागाडीसाठी लावावयाचा मेणबत्तीचा जर्मनीमध्ये तयार झालेला दिवा असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहेत.