महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्त्यावर सुरू झालेल्या संघर्षांचे पडसाद पुण्यातही उमटले असून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन आमच्याविरुद्ध बोलून दाखवावे, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीने ठाकरे यांना दिले. दरम्यान, या दोन्ही पक्षांच्या कार्यालयांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून महापालिकेतही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या गाडीवर नगर येथे झालेल्या दगडफेकीनंतर मंगळवारी मध्यरात्री टिळक रस्त्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयावर दगडफेकीचे प्रकार झाले. काही तरुण मोटारसायकलवरून येऊन दगडफेक करून पळून जात होते. असा प्रकार तीनचार वेळा घडला. टिळक रस्त्यावर गिरे बंगला येथे राष्ट्रवादीचे कार्यालय आहे. दगडफेकीबरोबरच कार्यालयाच्या काचा फोडणे, कुंडय़ांची तोडफोड असेही प्रकार या वेळी झाले. याप्रकरणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष साबळे याच्यासह दहापंधरा जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी सकाळी मनसेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले. मात्र, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी शनिपार येथे हा मोर्चा अडवला. त्यामुळे तेथेच निषेध सभा घेण्यात आली. राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांबद्दल केलेल्या भाषेचा निषेध करून त्यांनी पुण्यात येऊन अशी भाषा करून दाखवावी, असे आव्हान पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या वेळी बोलताना दिले.
 पिंपरी-चिंचवड भागात मनेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात टायर जाळण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. शहरात इतर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.