पाणीकपातीच्या धोरणातील एक पाऊल म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे थांबवावीत, असे आवाहन महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेस केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बांधकाम व्यावसायिक पाण्याशिवाय होऊ शकणारी कामे करण्यास तयारही झाले. पण इतर उद्योगधंद्यांमध्येही पाण्याचा वापर होत असताना केवळ बांधकाम व्यवसायावरच गंडांतर का, इतर उद्योगांवर पाणीवापराचे र्निबध घालून चालेल का, या उपस्थित झालेल्या प्रश्नावर ‘लोकसत्ता’ने विविध उद्योग- व्यावसायिकांची मते जाणून घेतलेली मते..
 
संजय देशपांडे (बांधकाम व्यावसायिक)-
पाणी काटकसरीने वापरावे हे खरे आहे, पण केवळ बांधकाम व्यवसायावरच पाणीवापराच्या मर्यादा घालणे चुकीचे आहे. वाहन उद्योगापासून कागद आणि कापड उद्योग, हॉटेल उद्योग, बाटलीबंद पाणी आणि सॉफ्ट ड्रिंक उद्योगापर्यंतच्या व्यवसायांनाही पाणी लागतेच. पण या व्यवसायांच्या पाणीवापरावर कधीच र्निबध घातले जात नाहीत. बांधकाम व्यवसायातील कामे बंद राहिल्याने होणाऱ्या विलंबाचा ग्राहकांना फटका बसतोच, पण हातावर पोट असणाऱ्या हजारो लोकांचा रोजगारही बुडतो. बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात नाही. माझ्या बांधकामांसाठी मी जे बोअरवेलचे पाणी वापरतो त्याचा ‘पीएच’ खूप तीव्र आहे, त्यात तरंगणारे कणही आहेत. ते पाणी पिण्यासाठीच काय, पण आंघोळीलाही वापरण्यासारखे नसल्याचा पाणी तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल आहे. असे पिण्यासाठी सुरक्षित नसलेले पाणी, तसेच प्रक्रियेद्वारे पुनर्वापरासाठी तयार केलेले पाणी बांधकामांसाठी वापरण्याची परवानगी मिळावी.

अनंत सरदेशमुख (महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर)-
बांधकामांपेक्षा इतर उद्योगांना कमी पाणी वापरले जात असून त्या पाण्याचा पुनर्वापरही होऊ शकतो. बांधकाम व्यवसायात पाणीपुरवठा नसेल तर काम पुढे नेताच येत नाही. तसे उद्योगांचे नसते. उद्योगांमधील अनेक प्रक्रियांना पाणी लागत नाही, शिवाय अनेक कामगार उद्योगावर अवलंबून असतात. त्यामुळे उद्योगांच्या पाणीवापरावर वेगळे र्निबध नकोत.

चिंतामणी चितळे (हॉटेल व्यावसायिक)-
एक दिवसाआड पाणी येत असल्यामुळे हॉटेल व्यवसायाच्या पाणीवापरावर अघोषित र्निबध आलेच आहेत. भांडी घासताना नळ सोडून न ठेवता पातेल्यात पाणी घेऊन त्यात भांडी घासणे, जेवणाच्या टेबलांवर पाण्याचे ग्लास भरून न ठेवता जग भरून ठेवणे व ग्राहकांना लागेल तेवढेच पाणी घ्यायला लावणे, मोटारी धुताना त्या पाण्याचे फवारे न सोडता बादलीत पाणी घेऊन धुणे, असे काही उपाय आम्ही पाण्याच्या काटकसरीसाठी सुरू केले आहेत. हॉटेल व्यवसायाच्या पाणीवापरावर वेगळे र्निबध आणायचेच असतील तरी ते व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेऊन घालावेत. व्यवसायच बंद करायला लावणारे र्निबध नकोत.