‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते, पण केवळ पुस्तकेच नव्हे, तर आपल्याला येणारे विजेचे बिलही वाचले पाहिजे. कारण हे बिल वाचले तर तुम्ही पैसे वाचवू शकता.. अनेकांकडून केवळ वीजबिलावर असलेली अंतिम रक्कम वाचली जाते व त्यानुसार बिल भरले जाते. वीजबिल वाचण्याची व त्याच्या अभ्यासाची कला प्राप्त झाल्यास कोणत्याही भांडवलाशिवाय बिलात मोठी कपात करणे प्रत्येकाला शक्य आहे.
वीजक्षेत्रातील अभ्यासक योगेंद्र तलवारे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, अनुभवावर व तांत्रिक गोष्टींच्या माहितीच्या आधारे त्यांनी वीजबिल वाचण्याची व बिलात कपात करून दाखविण्याची शक्कल देणाऱ्या पुस्तकांची निर्मिती केली आहे. विजेचे क्षेत्र हे अत्यंत मोठे व किचकट आहे. वीजबिलांच्या बाबतीतही हा किचकटपणा असतो. वेगवेगळय़ा ग्राहकांसाठी वेगवेगळी बिले असतात. त्यातील वेगवेगळे शुल्क, कर व वीजवापराचे स्लॅब या गोष्टींमध्ये अनेकदा ग्राहक पडत नाही. ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याची सुविधा असल्याने बिलावरील केवळ रक्कम पाहून ती भरली जाते. आपला विजेचा वापर व त्यानुसार बिलात होणारी वाढ आदी गोष्टी अनेकदा लक्षात घेतल्या जात नाहीत. याच गोष्टीची जाण देणारी माहिती तलवारे यांनी पुस्तकांतून दिली आहे.
औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती अशा तिन्ही प्रकारांतील ग्राहकांसाठी वेगवेगळय़ा पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्युत देयक वाचणे एक कला’ या शीर्षकाची ही पुस्तके इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये तलवारे यांनी काढली आहेत. केवळ वीजबिल हा विषय घेऊन काढण्यात आलेली ही तांत्रिक व माहितीपूर्ण स्वरूपाची पहिलीच पुस्तके आहेत.
बँका, विमा कंपन्या, शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, हॉटेल, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, समाजसेवी संस्था, विविध दालने, रुग्णालये आदींमध्ये अनेकदा बिलांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचा दंड भरावा लागतो. बिलांबाबत माहिती नसल्यानेच हा प्रकार होत असतो. घरगुती ग्राहकालाही त्याच्या वीजबिलातील प्रत्येक रक्कम कशी आली, याची माहिती नसते. स्थिर आकार, वीज आकार, इंधन समायोजन आकार किती व कसे लावले जातात. युनिटच्या वेगवेगळय़ा स्लॅबनुसार विजेचा दर कसा वाढतो, याची माहिती अनेकांना नसते. त्यातून वीजबिल वाढत राहते. त्यामुळे विजेचे व्यवस्थापन कसे करावे, याच्या साध्या साध्या गोष्टींबरोबरच काय करावे व काय करू नये, हे तलवारे यांनी मांडलेले आहे. माहितीसाठी ९८२२६५३१०४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही तलवारे यांनी केले आहे. केवळ अज्ञानापोटी वीजग्राहकाचा होणारा मोठा तोटा दूर करण्याच्या दृष्टीने वीजबिल वाचण्याची कला देण्याचा हा खटाटोप सुरू असल्याचे तलवारे यांनी सांगितले.