कच्च्या मालाच्या वाढलेल्या दरामुळे फराळ महागले; मागणी मात्र कायम

दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठीच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीतील आवर्जून होणारी खरेदी म्हणजे तयार फराळाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात तयार होणाऱ्या तयार फराळाला मोठी मागणी आहे. मात्र, कच्च्या मालाच्या वाढलेल्या दरांमुळे तयार फराळाच्या किमतीत यंदा दहा ते पंधरा टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

सध्याच्या धकाधकीच्या दिनक्रमात महिलांना घरी फराळ तयार करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तयार फराळ खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाइकांना पाठवण्यासाठीही तयार फराळाची खरेदी पुण्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.

पुण्यात तयार फराळ निर्मिती मोठय़ा प्रमाणात केली जाते. महिला बचत गट तसेच पारंपरिक महिला व्यावसायिक, महिला मंडळे, खाद्यपदार्थाचे व्यावसायिक यांच्याकडून तयार फराळ तयार केला जातो. दिवाळीपूर्वी दहा-बारा दिवस आधीच तयारी करून फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली जाते. पुण्याचा तयार फराळ विविध देशांमध्ये जातो. त्यात प्रामुख्याने चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळी, चकली हे पदार्थ असतात. पुण्याची चकली आणि करंजी परदेशात विशेष प्रसिद्ध आहे.

सध्या डाळीसंह सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. तसेच वाहतूक, मजुरी यांच्याही दरात गेल्यावर्षीपेक्षा यंदा वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे तयार फराळाच्या दरात यंदा पंधरा टक्के वाढ झाली आहे, असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

पुणे महिला मंडळ गेल्या ३५ वर्षांपासून तयार फराळाच्या व्यवसायात आहे. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया आदी देशातून मंडळाला ऑर्डर मिळते. त्यामुळे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात केली जाते. फराळाला घरगुती चव असल्याने मागणी जास्त आहे.

– उल्का शहा, पुणे महिला मंडळाच्या प्रमुख