महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तो लगेचच रद्द केल्यावर आधी भरलेले शुल्क बुडत नाही. महाविद्यालयाने त्या जागेवर दुसऱ्या विद्यार्थ्यांला प्रवेश दिला असल्यास महाविद्यालयाचे आर्थिक नुकसान होत नाही. त्यामुळे महाविद्यालयाने ही रक्कम परत करायला हवी, असे आदेश ग्राहक न्यायमंचाने दिले आहेत. त्यामुळे एका प्रकरणात पुण्यातील एसएसपीएमएस संस्थेच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयाने एका विद्यार्थ्यांचे ६२ हजार रुपयांचे शुल्क आणि न्यायालयीन खर्चापोटी दहा हजार रुपये असे एकूण ७२ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक न्यायमंचाने दिले आहेत.
पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांच्यासमोर हे प्रकरण आले होते. शैशव कुलकर्णी या विद्यार्थ्यांने याबाबत तक्रार केली होती. तो मूळचा रत्नागिरीचा आहे. त्याने २०११-१२ साली एसएसपीएमएस संस्थेच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तो या महाविद्यालयात पहिले वर्ष उत्तीर्ण झाला. त्यानंतर दुसऱ्या वर्षांसाठी जून २०१२ मध्ये त्याने ६३,३०५ रुपयांचे शुल्क भरले. मात्र, काही कारणासाठी त्याने या महाविद्यालयाऐवजी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिकडे त्याने ७७,६१२ रुपये इतके शुल्क भरले. त्यानंतर त्याने एसएसपीएमएस संस्थेच्या महाविद्यालयाकडे शुल्क माघारी मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला ते परत मिळाले नाही.
त्यामुळे त्याच्या वडिलांनी पुण्यातील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय आणि मुंबईतील शिक्षण शुल्क समितीकडे तक्रार केली. त्यात एसएसपीएमएस संस्थेच्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांला शुल्क द्यावे अशी सूचना करण्यात आली. मात्र, त्यालाही महाविद्यालयाने दाद दिली नाही. त्यानंतर शैशव याने वकील मिलिंद महाजन यांच्यामार्फत ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागितली. त्यात भरलेले शुल्क म्हणून ६२,३०५ रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून १०,००० रुपये आणि मानसिक त्रासापोटी एक लाख रुपये मिळावेत, असा दावा दाखल केला. त्यावर सुनावणी झाल्यानंतर अध्यक्ष उत्पात यांनी गेल्या आठवडय़ात याबाबत निकाल दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एसएसपीएमएस संस्थेच्या महाविद्यालयाने शैशव याला त्याने भरलेल्या शुल्कापैकी एक हजार रुपये कापून घेऊन ६२,३०५ रुपये इतकी रक्कम तसेच, शारीरिक-मानसिक त्रास आणि खटल्याच्या खर्चापोटी १०,००० रुपये द्यावेत. महाविद्यालयाने शैशव याच्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्यांला प्रवेश दिला. त्या विद्यार्थ्यांकडून सत्राचे शुल्क घेतलेले आहे. अशा प्रकारे महाविद्यालयाचे आर्थिक नुकसान झालेले नाही. त्यामुळे शैशव हा शुल्क माघारी मिळण्यास पात्र आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.