मानसिक आजारांवरील उपचारांसाठी मराठवाडय़ातून पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात हेलपाटे घालावे लागणाऱ्या मनोरुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भविष्यात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ‘जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमा’अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना मानसोपचारांचे प्रशिक्षण देण्याचे घाटते आहे. या प्रशिक्षणाची मोडय़ूल्स वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर तयार झाली असून डिसेंबरमध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
येरवडा मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपैकी जवळपास ७५ ते ८० टक्के मनोरुग्ण पुण्याबाहेरील असून त्यातील सर्वाधिक मनोरुग्ण मराठवाडय़ातून केवळ उपचारांसाठी येरवडा मनोरुग्णालयाच्या वाऱ्या करतात. लांबच्या प्रवासाचा खर्च आणि मनोरुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांचीही होणारी फरफट यामुळे अनेकदा उपचार पूर्ण न करता ते मध्येच खंडित करण्याकडे त्यांचा कल दिसतो. ठराविक मानसिक आजारांवर ग्रामीण भागातच उपचार होऊन गरज भासल्यासच मनोरुग्णाला प्रादेशिक मनोरुग्णालयात यायला लागावे अशा उद्देशाने ग्रामीण भागातील डॉक्टरांना मानसोपचारांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑगस्ट २०१३ पासून या निर्णयावर बैठका सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. आता या प्रशिक्षण कार्यक्रमाला मुहूर्त लागला आहे.
येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी सांगितले, ‘‘मनोरुग्ण मांत्रिक, देवऋषी आदींकडे फिरून आजाराच्या शेवटच्या टप्प्यात मनोरुग्णालयात येतात. ग्रामीण भागातील डॉक्टर त्यांच्या आजाराचे निदान करू शकले तर लवकर उपचारांना सुरुवात होऊ शकेल. या डॉक्टरांना ३-३ दिवसांच्या बॅचेसमध्ये मानसोपचारांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पातळीवरही मानसिक आजारांवरील औषधे उपलब्ध होणे हा या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा असेल.’’  
ग्रामीण भागात काम करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ मिळत नसल्याचा शासनाचा अनुभव असल्याचे मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे सहायक संचालक डॉ. मनीष रेंघे यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी ते म्हणाले, ‘‘जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत (डीएमएचपी) सध्या राज्यातील १२ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. या जिल्ह्य़ांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मानसोपचारांचे प्रशिक्षण देण्यासाठीच्या मोडय़ूल्सवर अखेरचा हात फिरवणे सुरू असून नोव्हेंबरअखेर ती पूर्णत: तयार होतील. राज्यातील ४ प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणि डीएमएचपीच्या मानसोपचारतज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. आधी राज्य पातळीवर आणि नंतर प्रादेशिक पातळीवर हे प्रशिक्षण होईल. असे प्रशिक्षित डॉक्टर ठराविक मानसिक आजारांवर त्या-त्या गावीच उपचार करू शकतील. नैराश्य, मूड डिसऑर्डर, चिंतारोग अशा आजारांसाठी याचा फायदा होऊ शकेल.’’