शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष चर्चा, प्रयोगशाळांमध्ये हवी ती गोष्ट समजून घ्यायची मोकळीक, विज्ञानाचे प्रकल्प पाहताना कळलेल्या नव्या गमतीजमती..आणि या गमतींबरोबरच झालेले प्रसिद्ध ‘रामन इफेक्ट’चे स्मरण.. अशा उत्साही वातावरणात शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. १९२८ साली याच दिवशी चंद्रशेखर व्यंकट रमण या शास्त्रज्ञाने प्रकाशाच्या गुणधर्माबद्दलचा प्रसिद्ध ‘रामन इफेक्ट’ हा शोध जाहीर केला होता. या शोधासाठी रमण यांना नोबेल पारितोषिकही मिळाले होते. रमण यांच्या या शोधाच्या स्मरणाचे निमित्त साधून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
पुणे विद्यापीठात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूशास्त्र, पर्यावरणशास्त्र या विभागांतील प्रयोगशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच पोस्टर आणि प्रयोगांच्या प्रारूपांचे प्रदर्शन, वैज्ञानिक चित्रफिती, लघुपट आणि नाटिकांचे प्रदर्शन, व्याख्याने आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध शाळा आणि महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनीही यात सहभाग नोंदवला.
‘आयुका’ या संस्थेतही विद्यार्थी आणि पालकांसाठी विज्ञानाची पर्वणीच होती. दुपारअखेर सहा हजार विद्यार्थ्यांनी संस्थेला भेट दिली होती. विज्ञानावरील व्याख्याने ऐकण्याबरोबरच विविध शास्त्रज्ञांच्या मूर्तीबरोबर फोटो काढत विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचा आनंद घेतला.
विविध शाळांमध्येही कार्यशाळा आणि विज्ञान प्रदर्शने रंगली. भवानी पेठेतील आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेत २५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांची माहिती करून घेतली.